Alegaons ST bus : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अकोला–आलेगाव सकाळची एसटी बस सेवा अचानक बंद केल्याने आलेगावसह परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि नोकरदारांचे हाल होत आहेत. बंद करण्यात आलेली बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी दिला आहे.

‘बस सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू!’ आलेगावकरांचा एसटी महामंडळाला निर्वाणीचा इशारा
निशांत गवई
पातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अकोला–आलेगाव सकाळची एसटी बस सेवा अचानक बंद केल्याने आलेगावसह परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि नोकरदारांचे हाल होत आहेत. बंद करण्यात आलेली बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी दिला आहे.

अकोला येथून सकाळी 8.50 वाजता आलेगावकडे येणारी आणि आलेगाव येथून सकाळी 10.30 वाजता अकोल्याकडे जाणारी एसटी बस कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि दैनंदिन प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दररोज अकोला येथील शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी, शिक्षक, नोकरदार तसेच विविध कामांसाठी जाणारे नागरिक या बसवर अवलंबून आहेत. अंबाशी येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थिनी, आलेगाव, उंबरवाडी व परिसरातील अनेक विद्यार्थी तसेच पातूर व देऊळगाव येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बस जीवनवाहिनी ठरली होती.
सुमारे 20 हजार लोकसंख्या असलेल्या आलेगावसह 20 ते 25 गावांचा संपर्क या बस सेवेवर अवलंबून असल्याने सेवा बंद झाल्यानंतर नागरिकांना खासगी व अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून एसटी महामंडळाच्याही महसुलाचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आज सकाळी असोला फाटा येथे अनेक विद्यार्थिनी बसच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. सकाळी 8 वाजताची अकोला–पांगरा ताटी बस रद्द झाल्यानंतर 8.50 वाजताची अकोला–आलेगाव बसही उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
उंबरवाडी येथून इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत शिक्षणासाठी दररोज आलेगावला येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. मुलींसाठी शासनाची स्वतंत्र बस असली तरी मुलांना त्या बसमध्ये प्रवास करता येत नसल्याने त्यांच्यासमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आलेगाव–अकोला बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी तसेच उंबरवाडीतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अथवा नियमित बसची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा परिसरातील नागरिकांच्या सहभागातून तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल. तसेच बस सेवा विनाकारण बंद करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध परिवहन मंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा निलेश कापकर यांनी दिला.
या मागणीस दुर्गाबाई ठाकरे, लताबाई डुकरे, शीतल धंदरे, रूपाली वाथे, शोभा डाखोरे, शालिनी वाथे, कमलाबाई ताजने, लक्ष्मीबाई तिवाले, पारूबाई गायकवाड, कमलाबाई धंदरे, रुक्मा शिंदे, समाधान शिंदे, समाधान गाढवे यांच्यासह अनेक नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.

