Schools have reopened : शहरातील जैन मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामास होत असलेल्या विलंबामुळे नागरिक, व्यापारी आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ऐन शाळा सुरू होण्याच्या काळात नगर परिषद प्रशासनाने रस्त्यावर केवळ खडी टाकून काम अर्धवट सोडल्याचा आरोप होत असून, अनेक दिवस उलटूनही डांबरीकरण पूर्ण झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

डांबरीकरण रखडले, विद्यार्थ्यांची कसरत सुरू; बाळापूरात जैन मंदिर मार्गावर नाराजी
बाळापूर : शहरातील जैन मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामास होत असलेल्या विलंबामुळे नागरिक, व्यापारी आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ऐन शाळा सुरू होण्याच्या काळात नगर परिषद प्रशासनाने रस्त्यावर केवळ खडी टाकून काम अर्धवट सोडल्याचा आरोप होत असून, अनेक दिवस उलटूनही डांबरीकरण पूर्ण झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हा मार्ग शहरातील महत्त्वाचा मार्ग मानला जातो. याच रस्त्याने दररोज शेकडो विद्यार्थी विविध शाळांमध्ये ये-जा करतात. मात्र, रस्त्यावरील डांबरीकरण रखडल्याने आणि खडी सैल झाल्याने पादचारी, विद्यार्थी, वाहनचालक तसेच व्यापारी सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात वाहनांच्या चाकांखाली उडणारी खडी रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये जाऊन नुकसान करत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. तर शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून चालताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, आम आदमी पार्टीचे बाळापूर शहराध्यक्ष अझीम शाह चांद शाह यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन जैन मंदिर मार्गाचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या काळात रस्त्याचे काम सुरू करून ते अर्धवट सोडण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मुख्य मागण्या :
• जैन मंदिर मार्गाचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करावे.
• रस्त्यावरील सैल खडी त्वरित हटवावी.
• विद्यार्थी, पादचारी आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.
• पावसाळ्यात रखडलेल्या कामाचा वेग वाढवून नागरिकांची गैरसोय दूर करावी.

