Mahabreaking

[breaking_news]

Partial relief: अर्धा दिलासा, अर्धी प्रतीक्षा; स्वस्त धान्य दुकानदारांचे तीन महिन्यांचे कमिशन अद्याप बाकी

Partial relief: स्वस्त धान्य दुकानदारांना दिलासा देणारा निर्णय घेत शासनाने प्रलंबित सहा महिन्यांच्या कमिशनपैकी तीन महिन्यांचे कमिशन अदा केले आहे. मात्र, एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे कमिशन अद्यापही बाकी असल्याने दुकानदारांची आर्थिक कोंडी कायम असून उर्वरित रक्कम तातडीने वितरित करावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे.

Partial relief

  कमिशनचा प्रश्न कायम, जुलैचे धान्यही अद्याप नाही; स्वस्त धान्य दुकानदारांवर दुहेरी संकट

साखरखेर्डा : स्वस्त धान्य दुकानदारांना दिलासा देणारा निर्णय घेत शासनाने प्रलंबित सहा महिन्यांच्या कमिशनपैकी तीन महिन्यांचे कमिशन अदा केले आहे. मात्र, एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे कमिशन अद्यापही बाकी असल्याने दुकानदारांची आर्थिक कोंडी कायम असून उर्वरित रक्कम तातडीने वितरित करावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ जुलै रोजी जानेवारी महिन्याचे कमिशन दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्यात आले. त्यानंतर दि. ९ जुलै रोजी फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे कमिशनही जमा करण्यात आले. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या दुकानदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे कमिशन अद्याप शासनाकडे प्रलंबित आहे.

तालुकास्तरावरील निरीक्षण अधिकाऱ्यांकडून प्रत्येक तालुक्याची माहिती एकत्रित करून ती पुढील कार्यवाहीसाठी वित्तीय सल्लागार तथा उपसचिव कार्यालय, मुंबई येथे पाठविण्यात येत आहे. त्यानंतर उर्वरित तीन महिन्यांचे कमिशनही लवकरच दुकानदारांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती सिंदखेडराजा येथील निरीक्षण अधिकारी शुभम फाले यांनी दिली.

दरम्यान, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशनधारकांना नियमित धान्य वितरण करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्मचारी वेतन, दुकानभाडे, वीजबिल, वाहतूक खर्च तसेच इतर दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कमिशन वेळेवर मिळणे अत्यावश्यक असते. मात्र, कमिशन वितरणातील विलंबामुळे अनेक दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

यासोबतच जुलै महिन्याचे धान्य अद्याप दुकानदारांना मिळाले नसल्याची तक्रारही पुढे आली आहे. जुलै महिन्याचे वितरण करण्यासाठी अवघे २० दिवस उरले असताना, ई-पॉस मशीनमधील अडचणी, इंटरनेट सुविधेचा अभाव आणि ई-केवायसी प्रक्रियेतील अडथळे यामुळे लाभार्थ्यांना वेळेत धान्य देणे कठीण जात असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहोचवावे, अशी मागणीही दुकानदारांकडून करण्यात आली आहे.

 

सिंदखेडराजा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष उद्धवराव नागरे यांनी, “स्वस्त धान्य दुकानदार नियमितपणे धान्य वितरण करीत असून त्यांना कमिशनही नियमित मिळाले पाहिजे,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

साखरखेर्डा येथील स्वस्त धान्य दुकानदार संतोष जैस्वाल यांनी, “महिन्याच्या सुरुवातीला धान्य उपलब्ध झाल्यासच लाभार्थ्यांना वेळेवर वितरण करणे शक्य होते. ई-पॉस आणि इंटरनेट अडचणींच्या पार्श्वभूमीवर धान्य वेळेवर मिळणे अत्यंत आवश्यक आहे,” असे सांगितले.

स्वस्त धान्य दुकानदारांनी शासनाकडे प्रलंबित तीन महिन्यांचे कमिशन तातडीने वितरित करण्याची मागणी केली असून, अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत त्वरीत निर्णय घेऊन दुकानदारांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top