Accused swindled : घर पाडताना सापडलेल्या सोन्याच्या नाण्यांचा माठ स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवत कोल्हापूर येथील एका व्यक्तीची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पातूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरे नाणे दाखवून विश्वास जिंकला, नंतर दिली बनावट नाणी; कोल्हापूरच्या व्यावसायिकाची १५ लाखांची फसवणूक
निशांत गवई
पातूर : घर पाडताना सापडलेल्या सोन्याच्या नाण्यांचा माठ स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवत कोल्हापूर येथील एका व्यक्तीची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पातूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज चांदोबा कांबळे (वय ४९, रा. शिवपार्वती पार्क, ओम साई निवास, वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी तक्रार दिली आहे. तर गणेश रमेश इंगळे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादी युवराज कांबळे यांच्याशी यापूर्वी हॉटेलमध्ये ओळख झाल्याचा संदर्भ देत दि. ३० जून २०२६ रोजी फोनवर संपर्क साधला. त्यावेळी आरोपीने आपल्या बहिण व मेहुण्याला घर पाडताना साडेतीन किलो वजनाचा सोन्याच्या नाण्यांचा माठ सापडल्याचे सांगितले. हा माल ५० लाख रुपयांत विकायचा असल्याचेही त्याने फिर्यादीला सांगितले.
विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने फिर्यादीला एक नाणे दिले. ते नाणे फिर्यादीने सोनाराकडे तपासणीसाठी दिले असता ते खरे सोने असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी युवराज कांबळे यांनी दि. ४ जुलै २०२६ रोजी नांदखेड फाटा, ता. पातूर, जि. अकोला येथे आरोपीला रोख १५ लाख रुपये दिले. त्याबदल्यात आरोपीने त्यांना ३ किलो ३०० ग्रॅम वजनाची नाणी दिली. मात्र, नंतर ही सर्व नाणी बनावट असल्याचे उघडकीस आले. आरोपीने खोट्या सोन्याच्या नाण्यांच्या मोबदल्यात १५ लाख रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एएसआय चव्हाण यांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पीएसआय मेश्राम करीत आहेत

