daily commute struggle : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मेडशी, शिरपूर आदी भागांतील उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींच्या शिक्षण व सुरक्षित प्रवासाचा प्रश्न विधान परिषदेत पोहोचला आहे. या भागातील उर्दू माध्यमाच्या सुमारे ११० विद्यार्थिनी आणि ७३ विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दररोज अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शाहबाबू विद्यालयात ये-जा करतात. संबंधित भागात उर्दू माध्यमातून सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पातूर येथे शिक्षणासाठी जावे लागत आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासासाठी भावना गवळी आक्रमक; शिरपूर–पातूर बससेवेचा प्रश्न सभागृहात
निशांत गवई
पातूर : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मेडशी, शिरपूर आदी भागांतील उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींच्या शिक्षण व सुरक्षित प्रवासाचा प्रश्न विधान परिषदेत पोहोचला आहे. या भागातील उर्दू माध्यमाच्या सुमारे ११० विद्यार्थिनी आणि ७३ विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दररोज अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शाहबाबू विद्यालयात ये-जा करतात. संबंधित भागात उर्दू माध्यमातून सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पातूर येथे शिक्षणासाठी जावे लागत आहे.

मात्र, मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थिनींसाठी चालविण्यात येणाऱ्या बससेवेचा लाभ जिल्ह्यांच्या सीमेमुळे या विद्यार्थिनींना मिळत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा आणि सुरक्षित प्रवासाचा हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन आमदार भावना गवळी यांनी विधान परिषदेत शिरपूर ते पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची जोरदार मागणी केली.

या प्रश्नासाठी शाहबाबू संस्था, पातूरचे सचिव सैय्यद इस्हाक राही यांनी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. अकोला व वाशिम जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक, आगार प्रमुख तसेच संबंधित कार्यालयांकडे त्यांनी वारंवार निवेदने व पाठपुरावा केला. बससेवा सुरू व्हावी यासाठी त्यांनी आमदार भावना गवळी यांच्याकडेही मागणी लावून धरली होती.
आमदार भावना गवळी यांनी यापूर्वीही या विषयावर अनेकदा पाठपुरावा केला होता. त्यानंतर त्यांनी बुधवारी, दि. ८ जुलै रोजी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करत मानव विकास मिशनची बससेवा शिरपूर–मालेगाव–मेडशी ते पातूर सुरू करण्याची मागणी केली. या प्रश्नावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
विधान परिषदेत या प्रश्नाला वाचा फुटल्यानंतर उर्दू माध्यमातील विद्यार्थिनी, विद्यार्थी तसेच पालकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थिनींचा प्रवास अधिक सुरक्षित, नियमित आणि सुलभ होईल, तसेच पालकांची चिंता कमी होऊन अनेक मुलींना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शाहबाबू संस्था, पातूरचे सचिव सैय्यद इस्हाक राही यांनी आमदार भावना गवळी यांनी विद्यार्थिनींसाठी सुरक्षित बससेवेची मागणी विधान परिषदेत मांडल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ही मागणी लवकर मंजूर होऊन बससेवा सुरू झाल्यास अल्पसंख्याक समाजातील हजारो विद्यार्थिनींना सुरक्षित, सुलभ आणि नियमित शिक्षणासाठी मोठी मदत होईल, असे त्यांनी म्हटले.
विद्यार्थिनींचे पालक शेख अय्याज यांनीही आमदार भावना गवळी यांनी मुलींच्या शिक्षणाचा आणि सुरक्षित प्रवासाचा प्रश्न विधान परिषदेत मांडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिरपूर, मालेगाव, मेडशी ते पातूर बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थिनींचा दैनंदिन प्रवास सुलभ होऊन शिक्षणासाठी मोठा आधार मिळेल, असे त्यांनी सांगितले.

