Mahabreaking

[breaking_news]

Drizzle halts farming :रिमझिम पावसाने शेतीकामांना ब्रेक; मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा

Drizzle halts farming : पावसाळा सुरू होऊनही देऊळगाव राजा तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट कायम आहे. मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पुढील पावसाची वाट पाहिली; मात्र तालुक्यात बहुतांश ठिकाणी केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शेतीकामांना ब्रेक बसत आहे. एकीकडे पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असताना, दुसरीकडे तणाचा वाढता प्रादुर्भाव आणि मजुरांचा तुटवडा यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक कोंडीत सापडला आहे.

Drizzle halts

देऊळगाव राजा तालुक्यात मजुरांचा तुटवडा, तणाचा वाढता त्रास; शेतकऱ्यांकडून शासनाच्या मदतीची मागणी

गजानन तिडके  

 देऊळगाव राजा : पावसाळा सुरू होऊनही देऊळगाव राजा तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट कायम आहे. मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पुढील पावसाची वाट पाहिली; मात्र तालुक्यात बहुतांश ठिकाणी केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शेतीकामांना ब्रेक बसत आहे. एकीकडे पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असताना, दुसरीकडे तणाचा वाढता प्रादुर्भाव आणि मजुरांचा तुटवडा यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक कोंडीत सापडला आहे.

तालुक्यातील अनेक भागांत आभाळ भरून येते, हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो; मात्र जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होईल, ओढे-नाले वाहतील किंवा विहिरींची पाणीपातळी वाढेल इतका दमदार पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यांची पिके आता पुढील पावसावरच अवलंबून आहेत; तर उर्वरित काही भागांत लागवड आणि शेतीची कामे अजूनही रखडलेली आहेत.

यंदा हवामान विभागाने सर्वसाधारणपेक्षा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीचे दोन टप्पे अपुऱ्या पावसात गेल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. पुनर्वसू नक्षत्रात तरी दमदार पाऊस होईल, अशी आशा होती; परंतु तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या रिमझिम पावसामुळे पिकांना अपेक्षित बळ मिळत नसताना तण मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तणनाशक फवारणी करूनही तण नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांना डवरणे, खुरपणी आणि इतर मशागतीच्या कामांवर अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

या सगळ्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे मजुरांचा तुटवडा. ग्रामीण भागात शेतीकामासाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत असून, जास्त मजुरी देण्याची तयारी दाखवूनही मजूर मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. परिणामी, अनेक कुटुंबांना घरातील लहान-मोठ्या सदस्यांना शेतात उतरवावे लागत आहे. वाढते उत्पादनखर्च, मजुरीचा प्रश्न, पावसाची अनिश्चितता आणि पिकांवरील तणाचा दबाव यामुळे बळीराजाची कोंडी अधिकच वाढली आहे.

मागील वर्षी मृग नक्षत्रापूर्वीच तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे जमिनीत खोलवर ओलावा साचला आणि शेतकऱ्यांनी त्या ओलाव्यावर मोठ्या प्रमाणावर पेरणी पूर्ण केली होती. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने खडकपूर्णा पट्टा वगळता तालुक्यात बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही. ओढे-नाले कोरडेच असल्याने छोटे-मोठे बंधारे, नदीवरील पाणीकट्टे आणि विहिरी यांमध्येही अपेक्षित पाणी साठा झालेला नाही. त्यामुळे शेतीपुरतेच नव्हे, तर मानव व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न पुढील काळात गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे नियोजन विस्कळीत होत असताना शासनाकडून ठोस उपाययोजना, मजुरांच्या प्रश्नावर पर्याय, तसेच पिकांच्या नुकसानीबाबत मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. “निसर्ग साथ देत नाही आणि शासनही वेळेवर मदतीला धावत नाही,” अशी भावना ग्रामीण भागात तीव्र होताना दिसत आहे.

 “जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला; पण आमच्या भागात अजूनही फक्त रिमझिम पाऊस सुरू आहे. शेतीची कामे अडकली आहेत, पिकांना पुरेसा जोर मिळत नाही आणि मजूर मिळणे तर फारच कठीण झाले आहे. मोठ्या पावसाशिवाय खरीप हंगामाला गती मिळणार नाही.”

आनंदा वाघ, पांगरी माळी (शेतकरी)

“पावसाळा सुरू होऊनही पिकांसाठी आवश्यक असा दमदार पाऊस झालेला नाही. आम्ही शेतकरी अजूनही मोठ्या पावसाची वाट पाहत आहोत. अनेक वर्षांपासून निसर्गाची साथ कमी होत चालली आहे आणि शासनाकडूनही वेळीच ठोस मदत मिळत नाही, ही आमच्यासमोरील मोठी समस्या आहे.”

लिंबाजी डोईफोडे, डोईफोडेवाडी (शेतकरी)

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top