Mahabreaking

[breaking_news]

Erratic power supply: देऊळगाव राजा तालुक्यात विजेचा खेळखंडोबा; ‘कभी हाँ, कभी ना’ पुरवठ्याने ग्राहक संतप्त

Erratic power supply: तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असतानाच वीजपुरवठ्याचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने घरगुती ग्राहक, शेतकरी, व्यावसायिक आणि लघुउद्योगिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. वेळेवर वीजबिल भरूनही तासन्‌तास अंधार सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, महावितरणचे मान्सूनपूर्व कामकाज फक्त कागदावरच झाले काय? असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

Erratic power supply

  बिले वेळेवर भरा, पण वीज मात्र हमीची नाही! महावितरणच्या कारभारावर देऊळगाव राजात संताप

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असतानाच वीजपुरवठ्याचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने घरगुती ग्राहक, शेतकरी, व्यावसायिक आणि लघुउद्योगिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. वेळेवर वीजबिल भरूनही तासन्‌तास अंधार सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, महावितरणचे मान्सूनपूर्व कामकाज फक्त कागदावरच झाले काय? असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

तालुक्यात खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी नियमित वीज आवश्यक आहे. मात्र, एकीकडे पावसाची अनिश्चितता आणि दुसरीकडे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. शहरातही हीच अवस्था असून, बिघाडाच्या नावाखाली तासन्‌तास वीज गायब होत असल्याने व्यापारी, लघुउद्योग, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांचा दिनक्रम विस्कळीत झाला आहे. “आम्ही बिल वेळेवर भरतो, मग हा मनस्ताप आम्हालाच का?” असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, शहरातील महावितरण कार्यालयापासून काही मीटर अंतरावरच विद्युत तारा झाडांच्या फांद्या आणि वेलींनी वेढलेल्या दिसत आहेत. कार्यालयाजवळच जर अशी अवस्था असेल, तर तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील परिस्थिती किती बिकट असेल, याची कल्पनाच केलेली बरी. मान्सूनपूर्व काळात झाडांच्या फांद्या छाटणे, तारांवरील अडथळे दूर करणे, पोल व रोहित्रांची तपासणी करणे ही नियमित कामे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी ही कामे झालेलीच नाहीत, असा आरोप नागरिक करीत आहेत.

पावसाळ्यात झाडांच्या ओलसर फांद्या तारांवर येतात, करंट जमिनीवर उतरतो, रोहित्रांमध्ये बिघाड होतो आणि अख्ख्या भागाचा पुरवठा ठप्प होतो. त्यामुळे केवळ गैरसोयच नव्हे, तर अपघाताचा धोकाही वाढला आहे. पाळीव जनावरे आणि नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असताना महावितरण प्रशासन मात्र निव्वळ वीजबिले वसूल करण्यातच गुंतले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

ग्राहकांचे आणखी एक मोठे दुखणे म्हणजे थकबाकी वसुलीतील कथित दुहेरी निकष. घरगुती ग्राहकांचे अल्प थकबाकीवर कनेक्शन तातडीने तोडले जाते; मात्र लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या मोठ्या व्यावसायिकांना आणि काही शासकीय कार्यालयांना मात्र मोकळीक दिली जाते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. “न्याय सर्वांसाठी समान असेल, तर कारवाईही सर्वांवर समान हवी,” अशी भूमिका ग्राहकांनी मांडली.

दरम्यान, महावितरणचे शहर अभियंता मुरलीधर नागरे यांनी वाढत्या भारामुळे रोहित्रांमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून मान्सूनपूर्व कामेही केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच थकीत वीजबिले भरून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांच्या वाट्याला अंधार, असुरक्षितता आणि मनस्तापच येत असल्याने आता महावितरणने कारणांची ढाल पुढे करण्याऐवजी ठोस कृती करून दाखवावी, अशीच तालुक्यातून जोरदार मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top