Farmers in Wadegaon : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाडेगाव उपबाजारात रविवारी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. दिवाळीनंतर भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा माल बाजारात विक्रीसाठी आणला होता. मात्र, अपेक्षित दर न मिळाल्याने ते आधीच नाराज होते, त्यातच दुपारच्या सुमारास पावसाचे आगमन झाल्याने गोंधळ उडाला.

सोयाबीन ओलावू नये म्हणून ताडपत्रीखाली माल झाकण्याची शेतकऱ्यांची धावपळ
राहुल सोनोने
वाडेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाडेगाव उपबाजारात रविवारी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. दिवाळीनंतर भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा माल बाजारात विक्रीसाठी आणला होता. मात्र, अपेक्षित दर न मिळाल्याने ते आधीच नाराज होते, त्यातच दुपारच्या सुमारास पावसाचे आगमन झाल्याने गोंधळ उडाला.
पाऊस सुरू होताच शेतकरी आपल्या मालाकडे धावले. ज्यांना जागा मिळाली त्यांनी तातडीने ताडपत्री टाकून सोयाबीन झाकले, तर काहींचा माल खाली पडल्याने ओलाव्याचा धोका निर्माण झाला. अनेकांनी कसाबसा माल पावसापासून वाचविला.बाजार समितीच्या आवारात पाण्याचा निचरा नीट नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. काहींचा माल अंशतः ओला झाला. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.

“सोयाबीनचं उत्पन्न यंदा आधीच कमी आहे. त्यात या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले आहे. आणखी किती दिवस वरुणराजा शेतकऱ्यांची परीक्षा घेणार?”
— असे एक शेतकरी निराशेने म्हणाले.

