Political struggle: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्तेच्या साखळीत सहभागी होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. सत्तेत असलेले नेते, नेत्यांची चापलुसी करणारे, तसेच पक्षासाठी तन, मन, धन अर्पण करणारे कार्यकर्ते — सर्वच उमेदवारीच्या शर्यतीत उतरले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या उंबरठ्यांवर ‘दिवाळी शुभेच्छा’च्या नावाखाली “भाऊ-दादा-बाप्पू” भेटीगाठींची लगबग सुरू असून, या गर्दीतून उमेदवारी कुणाला मिळते, याकडे ग्रामीण मतदारांचे लक्ष लागले आहे.

इच्छुक झाले सक्रीय : दिवाळीच्या शुभेच्छातून उमेदवारीची साखरपेरणी
बाळापूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्तेच्या साखळीत सहभागी होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. सत्तेत असलेले नेते, नेत्यांची चापलुसी करणारे, तसेच पक्षासाठी तन, मन, धन अर्पण करणारे कार्यकर्ते — सर्वच उमेदवारीच्या शर्यतीत उतरले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या उंबरठ्यांवर ‘दिवाळी शुभेच्छा’च्या नावाखाली “भाऊ-दादा-बाप्पू” भेटीगाठींची लगबग सुरू असून, या गर्दीतून उमेदवारी कुणाला मिळते, याकडे ग्रामीण मतदारांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातून ७ जिल्हा परिषद सदस्य व १४ पंचायत समिती सदस्यांच्या जागांसाठी एकूण शंभरहून अधिक इच्छुक उमेदवार आहेत. यातील तीन सर्कल अनुसूचित जातींसाठी, दोन सर्कल सर्वसाधारण तर दोन सर्कल इतर मागासवर्गीय प्रवर्ग (ओबीसी) साठी राखीव आहेत.
मागील निवडणुकीत वाडेगाव जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे एकमेव सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर निवडून आले होते. आता ते वंचित बहुजन आघाडीत दाखल झाले आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास “निष्ठावान उमेदवार कोण?” हा प्रश्न मतदारांना पडणार आहे, कारण या सर्कलमधून वंचितचे निष्ठावान कार्यकर्ते गोपाल राऊत हेही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.
पक्षनिष्ठा आणि धनशक्ती यामधील संघर्ष आता स्पष्ट दिसू लागला आहे. पारस आणि व्याळा सर्कलमध्ये निष्ठावानांपेक्षा धनवान आणि मतात बलवान उमेदवारांकडे पक्षश्रेष्ठींचा कल झुकत असल्याची चिन्हे आहेत. जातीय गणिताचाही या निवडणुकीत निर्णायक परिणाम दिसेल. वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बाळापूर तालुक्यात गेल्या २० वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत वर्चस्व टिकवले गेले आहे. परंतु, सत्तेच्या मोहात काही नेत्यांनी जातीच्या आधारावर उमेदवारी मिळवून नंतर पक्षत्याग केल्याने मतदारांमध्ये असंतोष आहे.
दरम्यान, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीत उमेदवारीसाठी तीव्र चढाओढ सुरू असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उबाठा गट) यांच्या महाआघाडीत मात्र गटबाजी आणि पाडापाडीचे राजकारण डोकावू लागले आहे. मागील वेळी महाआघाडी सत्तेत असताना दोन जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे व एक सदस्य काँग्रेसचा होता. मात्र आता सत्तेत नसल्याने उमेदवार शोधण्याची कसरत करावी लागणार आहे.
राजकीय समीकरणे बदलत्या टप्प्यावर असताना, बंडखोरांपेक्षा निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन जातीय बंधन बाजूला ठेवत त्यांना राजकीय बळ मिळाल्यास या निवडणुकीत तालुक्यातील राजकारणाचा चेहरामोहराच बदलू शकतो.

