Mahabreaking

[breaking_news]

Ujwal Public Schools :ग्रामीण भागात सक्षम पिढी घडविण्याचे उज्वल पब्लिक स्कूलचे कार्य उल्लेखनीय : नरेंद्र सोनवणे

Ujwal Public Schools : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव देत सक्षम पिढी घडविण्याचे कार्य उज्वल पब्लिक स्कूल करीत आहे. शाळेचे हे कार्य कौतुकास्पद असून ग्रामीण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे यांनी काढले. ते बोरगाव मंजू येथील उज्वल पब्लिक स्कूलमध्ये आयोजित नवीन शैक्षणिक वर्षाच्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात बोलत होते.

Ujwal Public Schools

 चिमुकल्यांचे गुलाबफुले, औक्षणाने स्वागत; उज्वल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशोत्सव जल्लोषात

बोरगाव मंजू : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव देत सक्षम पिढी घडविण्याचे कार्य उज्वल पब्लिक स्कूल करीत आहे. शाळेचे हे कार्य कौतुकास्पद असून ग्रामीण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे यांनी काढले. ते बोरगाव मंजू येथील उज्वल पब्लिक स्कूलमध्ये आयोजित नवीन शैक्षणिक वर्षाच्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात बोलत होते.

उन्हाळी सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेला हा शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शाळा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे हे होते. यावेळी मुख्याध्यापिका उज्वला सोनवणे आणि प्रशासकीय अधिकारी नीता राजेंद्र बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबाची फुले देऊन, औक्षण करून आणि कुंकू टिळा लावून स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रवेश केला. निळ्या रंगाच्या गणवेशातील चिमुकल्यांच्या स्वागतासाठी शाळेचे मुख्य प्रवेशद्वार पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या फुग्यांच्या कमानीने सजविण्यात आले होते. तसेच शाळेतील शिक्षिकांनी गुलाबी साडी परिधान करून पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता.

यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल भीती न राहता आनंद, आपलेपणा आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण व्हावी, हा या प्रवेशोत्सवामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उज्वल पब्लिक स्कूलने हा उद्देश अत्यंत सुंदर आणि प्रभावी पद्धतीने साध्य केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये जया हगवणे, राऊत मॅडम, स्वाती जैन, दिपाली देशमुख, दुर्गा असोलमोल, अश्विनी माहुलकर, मीना वानखेडे, रूपाली कडू, मोहिनी इंगळे, शारदा देशमुख, प्रीती वाघमारे, प्रशांत होनाळे, रूपाली इंगळे, पूजा भराटे आणि प्रतीक वानखेडे यांचा सहभाग होता. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेने नवागत विद्यार्थ्यांसाठी केलेल्या या भव्य आणि आपुलकीच्या स्वागताबद्दल पालकांनी शाळा प्रशासनाचे विशेष आभार मानले. गोड खाऊ वाटप आणि राष्ट्रगीताने या आनंददायी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

उज्वल पब्लिक स्कूलने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि शाळेबद्दलची ओढ निर्माण करणारा हा उपक्रम राबवून ग्रामीण शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख अधोरेखित केल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top