Mahabreaking

[breaking_news]

Students make a grand ceremonial entry : बग्गी रथातून विद्यार्थ्यांची दिमाखदार प्रवेश दिंडी; वाडेगाव जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

Students make a grand ceremonial entry : पि.एम. श्री. जिल्हा परिषद शाळा (मुले), वाडेगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि विविध आकर्षक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. बग्गी रथातून काढण्यात आलेली विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडी, फुलांची सजावट आणि नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात करण्यात आलेले स्वागत हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

grand ceremonial entry

  मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांच्या उपस्थितीत नवागतांचे जल्लोषात स्वागत; गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वितरण

राहुल सोनोने

वाडेगाव  : पि.एम. श्री. जिल्हा परिषद शाळा (मुले), वाडेगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि विविध आकर्षक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. बग्गी रथातून काढण्यात आलेली विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडी, फुलांची सजावट आणि नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात करण्यात आलेले स्वागत हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल धाडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिवाजी नाईकवाडे, पंचायत समिती बाळापूरच्या गटशिक्षणाधिकारी शोभना महेर तसेच वाडेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख माधव काळे उपस्थित होते. यावेळी गावाचे सरपंच मंगेश तायडे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवेशोत्सवानिमित्त संपूर्ण शाळा फुलांची सजावट, रंगीबेरंगी फुगे, आकर्षक रांगोळ्या आणि स्वागत फलकांनी सजविण्यात आली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने वातावरण भारावून गेले. यानंतर सुंदर सजविण्यात आलेल्या बग्गी रथातून विद्यार्थ्यांची भव्य प्रवेश दिंडी काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दिंडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन गणवेश, पाठ्यपुस्तके आणि आनंददायी स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, वाचनाची सवय, शिस्त आणि जिज्ञासू वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. तसेच पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी सातत्य, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करावे, असा संदेश दिला. तसेच पि.एम. श्री. योजनेअंतर्गत शाळेत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचे आणि शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता डंबाळे यांनी केले. प्रिया सोळंके यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली, तर गजानन कातखेडे यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि ग्रामस्थांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे व गोड भाताचे वाटप करण्यात आले. आनंद, उत्साह आणि नव्या उमेदीनिशी साजऱ्या झालेल्या या प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top