Tazia procession : बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव येथे २७ जून रोजी मोहर्रम व ताजिया उत्सव धार्मिक श्रद्धा, उत्साह आणि शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल्याने गावातील सामाजिक सलोखा, सर्वधर्मसमभाव आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश; मोहर्रम उत्सव शांततापूर्ण वातावरणात संपन्न
बाळापूर : बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव येथे २७ जून रोजी मोहर्रम व ताजिया उत्सव धार्मिक श्रद्धा, उत्साह आणि शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल्याने गावातील सामाजिक सलोखा, सर्वधर्मसमभाव आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

सकाळी ११ वाजता गावातील विविध ताजिये आणि मोहर्रमच्या मिरवणुका ढोल-ताशांच्या गजरात महात्मा फुले चौकात एकत्र आल्या. त्यानंतर बाळापूर वेस, काजीपुरा मार्गे सूफी चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजता मुख्य बाजारपेठेत पारंपरिक धार्मिक विधीनंतर ताजियांचे विसर्जन करण्यात आले.
महात्मा फुले चौकात मिरवणूक पोहोचताच हिंदू समाजातील नागरिकांनी ताजिये आणि ढोल पथकाचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. या प्रसंगी दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने परस्पर विश्वास, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.
मिरवणुकीदरम्यान पत्रकार राजेंद्र पल्हाडे यांनी ढोल वाजवत उत्सवात सहभाग नोंदविला. त्यांच्या सहभागामुळे उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि सामाजिक सलोख्याचा संदेश अधिक दृढ झाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

उत्सवाला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सागर पाटील, ग्रामपंचायत प्रशासक मेजर मंगेश तायडे, प्रकाश कंडारकर, शामलाल लोध, दत्ता मानकर तसेच राजकुमार चिंचोलकर, डॉ. शेख चांद, संतोष काळे, राहुल सोनोने, चंदन जंजाळ, राधेश्याम कळसकर, सोहेल खान, अमोल कळसकर, योगेश कंडारकर यांच्यासह गावातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहर्रम मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक शरद सैंदाणे, विनोद खाडे, वैशाली पाटील यांच्यासह सुमारे ३० पोलीस कर्मचारी आणि ७० होमगार्ड संपूर्ण मिरवणुकीदरम्यान सतर्कपणे कर्तव्य बजावत होते.
पोलीस प्रशासनाची दक्षता, उत्सव समितीचे नियोजन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मोहर्रम व ताजिया उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला. त्यामुळे वाडेगावची गंगा-जमुनी संस्कृती आणि सामाजिक ऐक्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

