Gas cylinder: पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे रविवारी पहाटे गॅस सिलिंडरला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात घबराट पसरली. मात्र, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना आणि संभाव्य जीवितहानी टळली.

तुलंगा बुद्रुक येथे गॅस सिलिंडरला आग; ओला कपडा टाकून ग्रामस्थांनी मिळवले आगीवर नियंत्रण
राहुल सोनोने
वाडेगाव : पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे रविवारी पहाटे गॅस सिलिंडरला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात घबराट पसरली. मात्र, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना आणि संभाव्य जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील नागसेन बाबुराव हातोले यांच्या घरी पहाटे स्वयंपाकासाठी गॅस सुरू करत असताना सिलिंडरच्या रेग्युलेटरजवळ अचानक आग लागली. आग भडकताच घरातील महिला घाबरल्या आणि आरडाओरड सुरू झाली.
घटनेची माहिती मिळताच शेजारी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आदित्य धुरंधर, सागर हातोले, गुलाब हातोले, सम्यक कांबळे, राहुल कांबळे आणि गणेश हातोले यांनी प्रसंगावधान राखत सिलिंडरवर ओला कपडा टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठे वित्तहानी झाली नसल्याने हातोले कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेनंतर गॅस सिलिंडर वापरताना आवश्यक सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले.

