State acknowledges: महाराष्ट्र शासनाने सन २०२४ चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर केले असून अकोला जिल्ह्याने यंदा दुहेरी मान पटकावला आहे. पातूर तालुक्यातील विवरा येथील शेतकरी वंदना देविदास धोत्रे यांना ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ तर दिग्रस बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र महादेव ताले यांना सेंद्रिय शेतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

मुंबईत १ जुलैला होणार गौरव; जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर
राहुल सोनोने
वाडेगाव : महाराष्ट्र शासनाने सन २०२४ चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर केले असून अकोला जिल्ह्याने यंदा दुहेरी मान पटकावला आहे. पातूर तालुक्यातील विवरा येथील शेतकरी वंदना देविदास धोत्रे यांना ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ तर दिग्रस बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र महादेव ताले यांना सेंद्रिय शेतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
विवरा येथील वंदना धोत्रे यांनी आपल्या शेतीत शंभर टक्के सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग राबविला आहे. सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’साठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारात दोन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राचा समावेश आहे. येत्या १ जुलै रोजी मुंबई येथे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
वंदना धोत्रे यांनी दोन एकर क्षेत्रात विविध भाजीपाला पिकांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले आहे. शेतातील झाडपाला, कंपोस्ट खत, गोमूत्र तसेच घरी तयार केलेल्या जीवामृताच्या साहाय्याने त्यांनी नैसर्गिक शेती फुलवली आहे. त्यांच्या या प्रयोगाची कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून दखल घेतली होती.
दिग्रस बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र महादेव ताले यांना सेंद्रिय शेतीतील उत्कृष्ट कार्यासाठी ‘कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता त्यांनी स्वतःच्या कष्टावर सेंद्रिय शेतीचा आदर्श पॅटर्न उभा केला आहे.
राजेंद्र ताले हे १९९९ पासून म्हणजेच गेल्या २५ वर्षांपासून शंभर टक्के सेंद्रिय शेती करत आहेत. पिकांच्या वाढीसाठी आणि कीड नियंत्रणासाठी ते लसूण, मिरची, तंबाखू, गूळ, अंडी, ताक तसेच मोड आलेल्या धान्यांचा वापर करून स्वतःच सेंद्रिय कीटकनाशके आणि जीवामृत तयार करतात.
साडेसहा एकर क्षेत्रात ते दरवर्षी केळी, पपई, कापूस, हळद यांसह ३० ते ३५ प्रकारची पिके घेतात. तसेच त्यांनी केळी व पपईच्या नव्या जाती विकसित केल्या आहेत. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून एका एकरातून तब्बल साडेआठ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवून त्यांनी अनेक शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
जिल्ह्यातील या दोन्ही शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

