Issue of quality fertilizer : विदर्भातील शेतकऱ्यांना दर्जेदार रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, नागपूरच्या बुटीबोरी येथील खत कारखान्याचा उत्पादन परवाना नूतनीकरण करून नव्या ठिकाणी स्थलांतरास मंजुरी देण्याची मागणी माजी मंत्री तथा विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कृषिदेव मिश्रखत कारखान्याला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न; डॉ. शिंगणे यांचे फडणवीसांकडे साकडे
बुलढाणा : विदर्भातील शेतकऱ्यांना दर्जेदार रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, नागपूरच्या बुटीबोरी येथील खत कारखान्याचा उत्पादन परवाना नूतनीकरण करून नव्या ठिकाणी स्थलांतरास मंजुरी देण्याची मागणी माजी मंत्री तथा विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात डॉ. शिंगणे यांनी नमूद केले आहे की, दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ही संस्था १९४८ पासून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कार्यरत असून रासायनिक खतांच्या वितरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राज्य शासनाने संस्थेला रासायनिक खतांचा संरक्षित साठा राखण्यासाठी नोडल एजन्सी म्हणूनही नियुक्त केले आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खते उपलब्ध व्हावीत या उद्देशाने संस्थेने १९७८ मध्ये नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे कृषिदेव १८:१८:१८ मिश्रखत निर्मितीचा कारखाना सुरू केला होता. मात्र कालांतराने बुटीबोरी गावाचा विस्तार झाल्याने कारखान्याच्या परिसरात निवासी वसाहती आणि बाजारपेठ विकसित झाली. त्यामुळे प्रदूषणासंदर्भात स्थानिकांकडून तक्रारी येऊ लागल्या.
या पार्श्वभूमीवर संस्थेच्या संचालक मंडळाने २०१८ मध्ये बुटीबोरी येथील कारखाना इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उमरेड तालुक्यातील मरजघाट येथे ११ एकर जागा खरेदी करण्यात आली. तसेच १ सप्टेंबर २०२१ पासून बुटीबोरी कारखान्यातील उत्पादन बंद करून जुनी जागा विक्री करण्यात आली.
डॉ. शिंगणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याच्या उत्पादन परवान्याची वैधता २७ मार्च २०२२ पर्यंत होती. नवीन जागेवर कारखाना उभारण्याच्या प्रक्रियेत उत्पादन परवान्यावर नवीन पत्त्याची नोंद करून तोपर्यंत परवाना निष्क्रिय (डॉर्मन्सी) स्थितीत ठेवण्याबाबत कृषी विभागाशी २०१९ पासून सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र कारखान्याची जागा आणि यंत्रसामग्री विक्री झाल्यामुळे परवाना नूतनीकरण शुल्काचा भरणा करता आलेला नाही.
पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये कृषिदेव १८:१८:१८ मिश्रखताला मोठी मागणी असल्याचे नमूद करत, नवीन जागेवर कारखाना सुरू झाल्यास शेतकऱ्यांना दर्जेदार खते उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
यासाठी बुटीबोरी कारखान्याचा उत्पादन परवाना नूतनीकरण करून नव्या ठिकाणाचा पत्ता नोंदविण्यासंदर्भात कृषी आयुक्तालय, पुणे यांना आवश्यक निर्देश देण्याची विनंती डॉ. शिंगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या मागणीमुळे विदर्भातील सहकार क्षेत्र तसेच कृषी क्षेत्रात पुन्हा एकदा खत निर्मिती प्रकल्प सुरू होण्याच्या शक्यतेकडे शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.

