Rain showers : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बीबी मंडळातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सोमवार, २२ जून रोजी सुरू झालेल्या पावसाच्या सरींनी परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवले असून कोमेजत चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन; कोमेजलेल्या पिकांना जीवदान
रमेश खंडागळे
बीबी : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बीबी मंडळातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सोमवार, २२ जून रोजी सुरू झालेल्या पावसाच्या सरींनी परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवले असून कोमेजत चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्याच्या आधारे ठिबक सिंचन करून हळद, मिरची, कपाशी यांसारख्या पिकांची लागवड केली होती. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीनंतर पावसाने दडी मारल्याने पिकांसमोर पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. विहिरींची पाणीपातळी घटल्याने अनेक ठिकाणी सिंचनासाठीही अडचणी निर्माण झाल्या होत्या.
पावसाअभावी मिरचीची पिके तसेच संत्रा बागा वाळण्याच्या मार्गावर पोहोचल्या होत्या. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते आणि त्यांच्या नजरा सतत आभाळाकडे लागल्या होत्या. अखेर सोमवार व मंगळवारी झालेल्या समाधानकारक पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिकही त्रस्त झाले होते. सोमवारी झालेल्या पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून दिलासा मिळाल्याने नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.
पाऊस आणखी चांगला होईल या अपेक्षेने शेतकरी शेतीच्या कामांना वेग देत असून पेरणीपूर्व मशागतीसह विविध कृषी कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र बीबी मंडळ परिसरात पाहावयास मिळत आहे. आगामी काही दिवसांत पावसाने सातत्य राखल्यास खरीप हंगामाला चांगली सुरुवात होण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

