Mahabreaking

[breaking_news]

Will the BJP: जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित होणार?; शिंगणे यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

Will the BJP: बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून सहकार आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आले आहेत. जिल्हा बँकेवर गेल्या 14 वर्षांनंतर पुन्हा लोकनियुक्त संचालक मंडळ येणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Will the BJP

 सहकारातून राजकारणाला नवी दिशा; डॉ. शिंगणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची जिल्ह्यात चर्चा

अशोक इंगळे

साखरखेर्डा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून सहकार आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आले आहेत. जिल्हा बँकेवर गेल्या 14 वर्षांनंतर पुन्हा लोकनियुक्त संचालक मंडळ येणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, यंदाची जिल्हा बँक निवडणूक भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेतृत्वाखाली लढविण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. या प्रक्रियेत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा असून, त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबतही राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.दुसरीकडे डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपण केवळ मुख्यमंत्र्यांना वेगळ्या विषयासाठी भेटण्यास गेल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भाजपात प्रवेश करणार नसून सध्या तरी राकॉ शरद पवार गटातच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून डॉ. शिंगणे यांच्या राजकीय भवितव्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. दरम्यान, राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया जाहीर केल्यानंतर या चर्चांना आणखी वेग आला आहे. सहकार क्षेत्रात शिंगणे कुटुंबाचा दीर्घकालीन प्रभाव राहिला असून, सहकारमहर्षी कै. भास्करराव शिंगणे यांनी जिल्ह्यात उभारलेल्या सहकारी संस्थांचे जाळे आजही प्रभावी मानले जाते.

जिल्ह्यातील अनेक राजकीय जाणकारांच्या मते, सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी आणि अडचणीत आलेल्या सहकारी संस्था, सूतगिरण्या व कारखानदारीला चालना देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने विकासात्मक निर्णय व आर्थिक मदत मिळविण्यासाठी सत्तेशी जवळीक उपयुक्त ठरू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विशेष म्हणजे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत सर्वपक्षीय समन्वयाची परंपरा राहिली आहे. मात्र यंदा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासह विविध राजकीय शक्ती एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत डॉ. शिंगणे यांचे नेतृत्व आणि त्यांचा अंतिम राजकीय निर्णय जिल्ह्यातील समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो.

राजकीय निरीक्षकांच्या मते, जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर अपेक्षित असलेल्या जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही या घडामोडींचा प्रभाव पडू शकतो. डॉ. शिंगणे यांच्यासोबत असलेला पारंपरिक कार्यकर्ता वर्ग कोणती भूमिका घेतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या भूमिकांनाही या राजकीय घडामोडींमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले असून त्यांच्या पुढील निर्णयांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top