damage crops on 13,000 hectares: जिल्ह्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हुमनी अळीमुळे साेयाबीनसह इतर पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. तब्बल १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले हाेते. पिक नुकसानीचा संयुक्त पंचनामा करून जिल्हा प्रशासनाने २४ सप्टेंबर २०२५ राेजी अहवाल शासनाकडे पाठविला हाेता. मात्र, एक महिना उलटूनही शेतकऱ्यांना मदतच मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, हुमनी अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे.

३३ हजार शेतकऱ्यांचे झाले हाेते नुकसान : अहवाल पाठवून एक महिना उलटला
बुलढाणा : जिल्ह्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हुमनी अळीमुळे साेयाबीनसह इतर पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. तब्बल १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले हाेते. पिक नुकसानीचा संयुक्त पंचनामा करून जिल्हा प्रशासनाने २४ सप्टेंबर २०२५ राेजी अहवाल शासनाकडे पाठविला हाेता. मात्र, एक महिना उलटूनही शेतकऱ्यांना मदतच मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, हुमनी अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात साेयाबीनवर हुमनी अळीने आक्रमण केले हाेते. हुमनी अळीच्या प्रादुर्भावाने १२ हजार ९९२.७९ हेक्टरवरील साेयाबीन, मका, तूर आणि उडीद पिकाचे नुकसान झाले हाेते. जिल्हास्तरीय अंतिम संयुक्त स्वाक्षरी अहवालानुसार, एकूण ८०९ गावे आणि ३३,५१४ शेतकरी हुमणी अळीच्या बाधित क्षेत्रात आले असून एकूण १२,९९२.७९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक बाधित क्षेत्र चिखली तालुक्यात असून येथे १०,०४५ शेतकरी बाधित झाले असून ३,१६७.०५ हेक्टर क्षेत्र अळीग्रस्त झाले हाेते. दुसऱ्या क्रमांकावर मोताळा तालुका असून येथे ५,७१३ शेतकरी आणि २,२६०.५८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
जिल्ह्यातील नांदुरा (२,३३९.९६ हेक्टर), बुलडाणा (१,२०३.९७ हेक्टर) आणि खामगाव (१,१३८.८० हेक्टर) या तालुक्यांनाही मोठा फटका बसला आहे. तर मलकापूर, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, संग्रामपूर व महाकर तालुक्यांमध्येही हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला हाेता. अहवालानुसार, हुमणी अळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झाला असून जिल्ह्यातील १२,९३६.६८ हेक्टर क्षेत्र सोयाबीनखालील पिकावर अळीने हल्ला केला आहे. त्याचप्रमाणे मका पिकाचे ५३.८२ हेक्टर, तर उडीद आणि तूर पिकाचे मिळून २.२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले हाेते. नगदी पिक म्हणून शेतकरी साेयाबीनचे उत्पादन घेतात. मात्र, साेयाबीनचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियाेजनच बिघडले आहे. त्यातच अतिवृष्टीची मदत मिळत असली तरी हुमनी अळीने झालेल्या नुकसानाची भरपाई अद्यापही मिळाली नाही. अहवाल सादर करून एक महिना उलटूनही मदतीसाठी शासनाकडून कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे, शेतकरी संकटात सापडले आहेत.

