Gold worth ₹4.77 lakh : अंढेरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला लाखो रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशान्वये मूळ मालकांना परत करण्यात आला. या कारवाईमुळे फिर्यादींनी पोलिस प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.

न्यायालयाच्या आदेशानंतर ७८.५७० ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल फिर्यादींच्या ताब्यात
गजानन तिडके
देऊळगाव राजा : अंढेरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला लाखो रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशान्वये मूळ मालकांना परत करण्यात आला. या कारवाईमुळे फिर्यादींनी पोलिस प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.
पोलीस स्टेशन अंढेरा येथे अपराध क्रमांक ००८१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३३३, १२७(२) व ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी ७८.५७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. या मुद्देमालाची अंदाजित किंमत ४ लाख ७७ हजार रुपये इतकी आहे.

प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर आणि न्यायालयाची आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर सदर सोन्याचा मुद्देमाल फिर्यादी दत्तू विष्णु खरात, भारत ताकतोडे आणि शिवनारायण ताकतोडे (रा. बायगाव बु., ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांना परत करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती मनिषा कदम यांच्या हस्ते हा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्ह्यांच्या तपासात नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे, पोहेकॉ सिद्धार्थ सोनकांबळे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन फुसे व किशोर जाधव यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.
वेळीच तपास करून चोरीचा ऐवज हस्तगत केल्याने आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून तो मूळ मालकांना परत मिळाल्याने संबंधित कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

