Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर २२ ऑक्टाेबर राेजी दाेन वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार तर महिला गंभीर जखमी. ट्रकचे टायर तपासत असताना क्लिनर चाकाखाली सापडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य एका अपघातात भरधाव कार कंटेनरवर आदळल्याने महिला गंभीर जखमी झाली.

टायर तपासत असताना चाकाखाली आल्याने क्लिनरचा मृत्यू, कार कंटेनरवर आदळली
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : समृद्धी महामार्गावर २२ ऑक्टाेबर राेजी दाेन वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार तर महिला गंभीर जखमी. ट्रकचे टायर तपासत असताना क्लिनर चाकाखाली सापडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य एका अपघातात भरधाव कार कंटेनरवर आदळल्याने महिला गंभीर जखमी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकत्त्यावरून मुंबईकडे जाणारा ट्रक क्र. डब्ल्यबी २५ एल ६२५६ चालक अयुब अली मंडल (वय अंदाजे ३५, रा. पश्चिम बंगाल) हा चॅनल क्रमांक ३२१.३ वर वाहन थांबवून टायर तपासत असताना, त्याच ट्रकचा क्लिनर शाहरुला मंडल (रा. पश्चिम बंगाल) हा मागील टायरखाली येऊन जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे बिबी येथे हलवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
घटनास्थळी एपीआय संदीप इंगळे, पो.का. गणेश उबाळे, अरुण भुतेकर तसेच १०८ ॲम्बुलन्स चालक प्रदीप पडघान आणि डॉ. स्वप्नील सुसर उपस्थित होते.
समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक २९८ वर कार क्रमांक एमएच ०२ जीपी ११३० ही मुंबईवरून नागपूरकडे जात असताना समोरील कंटेनर क्र. एमएच ४८ डीसी २१३७ ला मागून जोरदार धडक बसली. अपघातात कविता हुंगे (वय ५०) गंभीर जखमी झाली असून त्यांना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने सरकारी रुग्णालय, मेहकर येथे हलविण्यात आले.
अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास मेहकर पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

