Mahayuti government : एप्रिल २०२६ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांच्या मदत निधीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हजारो बाधित शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; २,२२० शेतकऱ्यांना मिळणार मदत
बुलढाणा : एप्रिल २०२६ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांच्या मदत निधीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हजारो बाधित शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

शासनाच्या अधिकृत निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यातील २ हजार २२० बाधित शेतकऱ्यांसाठी २ कोटी २७ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १,३३५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची दखल घेऊन ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून मदतीचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची माहिती अचूकपणे नोंदवून पारदर्शक पद्धतीने निधी वितरित करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
शासनाने मदत वाटपात कोणतीही द्विरुक्ती होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. एका हंगामात एकदाच मदत देण्यात येणार असून यापूर्वी मदत मिळालेल्या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ मिळणार नाही, याची जबाबदारी संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणाऱ्या या मदत निधीवर बँकांकडून कोणतीही कर्जवसुली करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मंजूर झालेली संपूर्ण मदत त्यांच्या खात्यात उपलब्ध होणार आहे.
या निधीअंतर्गत पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील एकूण १६ हजार २६७ बाधित शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यापैकी अमरावती विभागासाठी ३ कोटी ६९ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक २ कोटी २७ लाख ३२ हजार रुपयांचा वाटा मिळाला आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत मंजूर केल्याबद्दल अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे ना. मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

