crop in five acres: एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असतानाच शासनाकडून अद्याप मदत न मिळाल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यातच डोणगाव परिसरात तुरीवर ‘मर रोगा’चा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या रोगामुळे पिकाचे पूर्ण नुकसान झाल्याने मादणी येथील शेतकरी अमोल जाधव यांनी हतबल होऊन तब्बल ५ एकर तुरीवर रोटावेटर फिरविला.

डोणगाव : एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असतानाच शासनाकडून अद्याप मदत न मिळाल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यातच डोणगाव परिसरात तुरीवर ‘मर रोगा’चा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या रोगामुळे पिकाचे पूर्ण नुकसान झाल्याने मादणी येथील शेतकरी अमोल जाधव यांनी हतबल होऊन तब्बल ५ एकर तुरीवर रोटावेटर फिरविला.
मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या पिकात मर रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, शेतकऱ्यांनी दोन-तीन फवारण्या आणि ‘ड्रेंचिंग’ केल्यावरही रोगावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. परिणामी शेवटी रोटावेटर फिरवून पिकावर मात करण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे शेतकरी सांगत आहेत.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना शासनाने त्वरित आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा विदर्भातील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या मार्गावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

