Record Buddhist Viharas : भारत जनगणना २०२७ अंतर्गत घरवाडी मांडणीदर्शक नकाशा तयार करताना वापरण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा आदी धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र बौद्ध समाजाच्या उपासना स्थळ असलेल्या बुद्ध विहारांची नोंद करण्यात येत नसल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

बौद्ध विहारांना जनगणनेत स्थान न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
अकोला : भारत जनगणना २०२७ अंतर्गत घरवाडी मांडणीदर्शक नकाशा तयार करताना वापरण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा आदी धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र बौद्ध समाजाच्या उपासना स्थळ असलेल्या बुद्ध विहारांची नोंद करण्यात येत नसल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रासह देशभरात हजारो बुद्ध विहारे अस्तित्वात असून ती बौद्ध समाजाची प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक केंद्रे आहेत. जनगणना प्रक्रियेत त्यांची नोंद न झाल्यास ही उपासना स्थळे शासनाच्या अभिलेखांपासून वंचित राहतील. त्यामुळे बौद्ध समाजामध्ये नाराजी आणि असंतोष निर्माण होत आहे.
भारत सरकारने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम, १९९२ अंतर्गत बौद्ध समुदायाला धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मान्यता दिली आहे. अशा परिस्थितीत गुरुद्वारे, चर्च आणि मस्जिद यांची नोंद घेतली जात असताना बुद्ध विहारांचा समावेश न करणे हे अन्यायकारक असून घटनात्मक तत्त्वांच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात बौद्ध नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या श्रद्धास्थानांची अधिकृत नोंद होणे आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यातही मोठ्या संख्येने बुद्ध विहारे अस्तित्वात आहेत. त्यामुळे जनगणना २०२७ मध्ये बुद्ध विहारांची स्वतंत्रपणे नोंद घेण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे प्रदेश संघटक अशोक नागदेवे आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी अमन घरडे, आदित्य अवचार, अभिषेक डोंगरे, वैभव अवचार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, बौद्ध विहारांची जनगणनेत नोंद घेण्याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

