Ambedkarite people’s : संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारा अनिल मिश्रा आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट भिरकावून हल्ला करणारा किशोर तिवारी या दोन्ही देशद्रोही वकिलांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १८ ऑक्टोबरला आंबेडकरी जनतेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कदापि समाज सहन करणार नसल्याचे सांगत विषमतावाद्यांना धडा शिकवू, असा इशारा कुणाल पैठणकर यांनी यावेळी दिला.

विषमतावादी लोकांना धडा शिकवू : कुणाल पैठणकर
बुलढाणा : संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारा अनिल मिश्रा आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट भिरकावून हल्ला करणारा किशोर तिवारी या दोन्ही देशद्रोही वकिलांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १८ ऑक्टोबरला आंबेडकरी जनतेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कदापि समाज सहन करणार नसल्याचे सांगत विषमतावाद्यांना धडा शिकवू, असा इशारा कुणाल पैठणकर यांनी यावेळी दिला.
डॉ. आंबेडकरनगरमधील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. ‘बाबासाहेबांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात’ असे नारे देत परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावेळी बोलताना पैठणकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी समाजासह संपूर्ण देशाची अस्मिता आहेत. या देशाची घटना लिहून त्यांनी समानता रुजवली. प्रत्येक घटकाला न्याय दिला. मात्र, काही विषमतावादी मानसिकतेचे लोक समाजासमाजात विष पेरत आहेत. वकील अनिल मिश्रा, किशोर तिवारी यांच्यासारख्यांनी जातीय तेढ निर्माण केले आहे. अशा विकृत बुद्धीच्या लोकांना आंबेडकरवादी जशास तसे उत्तर देतील. आम्ही संविधानाच्या मार्गावर चालणारे लोक आहोत. आम्हाला कायदा हातात घेण्यास भाग पाडू नका, असा इशारा पैठणकर यांनी दिला.

ग्वालियर हायकोर्टचा विद्रूप मानसिकतेचा अनिल मिश्रा या वकिलावर पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही. त्याची सनद रद्द करावी, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, तसेच किशोरकुमार तिवारी याच्यावरही देशद्रोहाचा खटला चालवून यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर हरियाणा येथील वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरणकुमार यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीय द्वेषातून त्यांचा बळी घेतला. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशा अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चात सचिन सरकटे, सिद्धार्थ हिवाळे, आशिष खरात, समाधान जाधव, रामप्रसाद जाधव, संकेत जाधव, अशोक हिवाळे, विश्वास इंगळे, अनिल आराख, सचिन सरकटे, सुरज गवई, विवेक हिवाळे, मुकेश हिवाळे, विजय गवई, रामदास दाभाडे, विनोद हिवाळे, यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.

