Mahabreaking

[breaking_news]

Shivanand Bhanuse :वैचारिक नेतृत्वाला नवी जबाबदारी; डॉ. शिवानंद भानुसे मराठा सेवा संघाचे मुख्य प्रवक्ते

Shivanand Bhanuse :सुप्रसिद्ध व्याख्याते, कवी, लेखक, समीक्षक तसेच सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय विषयांचे अभ्यासक डॉ. शिवानंद नारायणराव भानुसे यांची मराठा सेवा संघाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्तीपत्र १ जून २०२६ रोजी संघाचे अध्यक्ष डॉ. विजय घोगरे, महासचिव इंजि. चंद्रशेखर शिखरे आणि कार्याध्यक्ष इंजि. नवनाथ घाडगे यांनी प्रदान केले.

Shivanand Bhanuse

संभाजी ब्रिगेडच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला मराठा सेवा संघात महत्त्वाची भूमिका

गजानन तिडके

देऊळगाव राजा : सुप्रसिद्ध व्याख्याते, कवी, लेखक, समीक्षक तसेच सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय विषयांचे अभ्यासक डॉ. शिवानंद नारायणराव भानुसे यांची मराठा सेवा संघाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्तीपत्र १ जून २०२६ रोजी संघाचे अध्यक्ष डॉ. विजय घोगरे, महासचिव इंजि. चंद्रशेखर शिखरे आणि कार्याध्यक्ष इंजि. नवनाथ घाडगे यांनी प्रदान केले.

डॉ. भानुसे हे गेल्या तीन दशकांपासून संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या वैचारिक चळवळीत सक्रिय असून विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. नोव्हेंबर २०२४ पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. मात्र समाजकारणाला अधिक वेळ देण्यासाठी त्यांनी ३१ मे २०२६ रोजी त्या पदाचा राजीनामा दिला.

डॉ. भानुसे यांची वैचारिक प्रगल्भता, विविध विषयांवरील सखोल अभ्यास, सामाजिक चळवळीतील दीर्घ अनुभव आणि जनसामान्यांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता लक्षात घेऊन मराठा सेवा संघाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून ते मराठा सेवा संघ तसेच संघप्रणीत संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आदी विविध कक्षांची भूमिका प्रसारमाध्यमांद्वारे मांडणार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा येथील रहिवासी असलेले डॉ. भानुसे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात कार्यरत आहेत. राज्यभर लोकप्रिय वक्ते, लेखक आणि कवी म्हणून त्यांची ओळख असून २० डिसेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित २० व्या झेप साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

भारतीय संविधान, मराठा आरक्षण आणि सामाजिक न्याय विषयांचे अभ्यासक म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे. विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके आणि मासिकांमधून त्यांचे नियमित लेखन प्रसिद्ध होत असते. तसेच विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्येही त्यांचा सातत्याने सहभाग असतो. सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवरील त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top