Mahabreaking

[breaking_news]

Arun Cheke :कनखर व्यक्तिमत्त्व, प्रामाणिक अधिकारी अरुण चेके काळाच्या पडद्याआड

Arun Cheke : लिंगा या छोट्याशा गावात जन्मलेले, बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक तथा प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि कनखर व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले अरुण बाबुराव चेके (वय ७०) यांचे सोमवारी, १ जून रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Arun Cheke

अशोक इंगळे

साखरखेर्डा : लिंगा या छोट्याशा गावात जन्मलेले, बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक तथा प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि कनखर व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले अरुण बाबुराव चेके (वय ७०) यांचे सोमवारी, १ जून रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेल्या अरुण चेके यांचे बालपण लिंगा येथे गेले. प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना शेंदुर्जन येथे जावे लागत असे. पुढील उच्च शिक्षण त्यांनी खामगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीस सुरुवात केली आणि साखरखेर्डा शाखेत शाखा व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाले.

कारकीर्दीत त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज, शिक्षकांचे वेतन, वैयक्तिक कर्ज अशा विविध आर्थिक कामकाजाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळली. कामाच्या व्यापामुळे अनेकदा रात्री उशिरापर्यंत बँकेत थांबून ग्राहकांची कामे पूर्ण करत असत. शिक्षकांचे पगार करण्यासाठी संध्याकाळनंतर येणाऱ्या शिक्षकांनाही त्यांनी कधी परत पाठविले नाही. त्यामुळे साखरखेर्डा परिसरातील सुमारे ४० गावांमध्ये त्यांची ओळख एक विश्वासू व मदतीस तत्पर अधिकारी म्हणून निर्माण झाली होती.

सहकार क्षेत्रात कार्यरत असताना सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या कार्यकाळात त्यांनी या भागातील जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या. तसेच माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीच्या काळातही ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते.

सेवानिवृत्तीनंतर ते साखरखेर्डा येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, चार बहिणी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. मुलगा अक्षय चेके हे मंठा पंचायत समितीत अभियंता म्हणून कार्यरत असून मुलगी अर्चना मेहकर येथे वास्तव्यास आहे. दुपारी ४ वाजता साखरखेर्डा येथील श्री रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पत्रकार सुधीर चेके, समाधान बुंधे, निवृत्ती खरात, रमेश ठोसरे, अशोक पाटील, दामोदर लांबाडे, बबनराव लोढे, अशोक इंगळे, अनंत रिंढे, सुनील रिंढे, अमित जाधव यांच्यासह अक्षय चेके यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. अरुण चेके यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम ४ जून रोजी सकाळी ९ वाजता साखरखेर्डा येथे होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top