Ten-Day Summer : जय बजरंग व्यायाम शाळा, जय बजरंग विद्यालय कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी दहा दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी बालसंस्कार व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १ जून ते १० जूनदरम्यान कुंभारी येथील जय बजरंग विद्यालयात होणार असून विविध शालेय क्रीडा प्रकारांसह संस्कारवर्गाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

१ ते १० जूनदरम्यान मोफत निवासी शिबिर; विद्यार्थ्यांना क्रीडा व संस्कारांचे धडे
संजय तायडे
बोरगाव मंजू : जय बजरंग व्यायाम शाळा, जय बजरंग विद्यालय कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी दहा दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी बालसंस्कार व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १ जून ते १० जूनदरम्यान कुंभारी येथील जय बजरंग विद्यालयात होणार असून विविध शालेय क्रीडा प्रकारांसह संस्कारवर्गाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शिबिर आयोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाशभाऊ बिडकर होते. यावेळी शत्रुघ्न बिडकर, सदानंद जाधव, राजेंद्र जळमकर, डॉ. सूर्यभान नागुलकर, श्रीराम पालकर, दिनकर धामणकर, जानराव आगळे, प्रदीप जाधव, संजय तायडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात मुलांसाठी निवासी सुविधा उपलब्ध असणार असून मुलींसाठी अनिवासी स्वरूपात प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलींना सकाळी ६ वाजता शिबिरस्थळी आणून सायंकाळी ८ वाजता पालकांनी परत घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिबिर पूर्णतः मोफत असून सहभागी मुला-मुलींसाठी भोजन, दोन वेळचा नाश्ता तसेच लोअर व टी-शर्ट स्वरूपातील गणवेश आयोजकांकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
प्रशिक्षणात योग, व्यायाम, कवायत, समूहगान, देशी खेळ, संस्कार प्रबोधन व ज्ञानामृत सत्रांचा समावेश राहणार आहे. तसेच धनुर्विद्या, योग, नेटबॉल, थ्रोबॉल आणि मल्लखांब यांसारख्या शासनमान्य खेळांचे प्रशिक्षण नामांकित प्रशिक्षकांकडून दिले जाणार आहे. कुंभारी, कातखेड, कैलासनगर, मराठा नगर, येवता आणि परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी या शिबिरात सहभागी होऊ शकणार आहेत. आयोजकांनी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी जय बजरंग विद्यालय कुंभारी किंवा आयोजकांशी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

