elections : जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच पंचायत समितीच्या आरक्षणाची घोषणा होताच राजकीय वर्तुळात चैतन्य निर्माण झाले आहे. इच्छुक उमेदवार जोमात प्रचार योजना आखताना दिसत असले तरी, पक्षातील वरिष्ठ नेते मात्र संभ्रमात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण आधी निवडणुका नगर परिषदेच्या होणार की जिल्हा परिषदेच्या — हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

डोणगाव : जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच पंचायत समितीच्या आरक्षणाची घोषणा होताच राजकीय वर्तुळात चैतन्य निर्माण झाले आहे. इच्छुक उमेदवार जोमात प्रचार योजना आखताना दिसत असले तरी, पक्षातील वरिष्ठ नेते मात्र संभ्रमात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण आधी निवडणुका नगर परिषदेच्या होणार की जिल्हा परिषदेच्या — हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
ऐन दिवाळीत आरक्षण जाहीर झाल्याने सर्व पक्षांत इच्छुकांची गर्दी वाढली आहे. मात्र जर जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगर परिषदेच्या नंतर झाल्या, तर इच्छुक उमेदवारांना पुन्हा जनतेसमोर जाण्याचा व अधिक खर्चाचा सामना करावा लागेल. त्यामुळे काहींची गळती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पक्षांतर्गत नाराजी निर्माण होऊ नये, या भीतीने अनेक नेते ‘कोमात’ गेले आहेत, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
या वर्षी डोणगाव जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण वर्गासाठी राखीव नसल्याने अनेक इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी आपल्या मुलांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार करीत असल्याची चर्चा आहे. तसेच, या सर्कलमध्ये काही नवीन गावे समाविष्ट झाली असून काही जुनी गावे वगळली गेल्याने, उमेदवारीचा कस यावेळी लागणार आहे.
राजकीय आघाड्यांवर नजर टाकल्यास कॉंग्रेस पक्षाकडून जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी हे सक्रिय असून, उमेदवारीची मागणी करीत आहेत. शिंदे गट शिवसेनेकडून माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांची उमेदवारी चर्चेत आहे. डॉ. गजानन उल्हामाले व ना. प्रतापराव जाधव यांचे पुत्र ऋषी जाधव हेही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख निंबाजी पांडव हे डोणगाव सर्कलमधून इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप पांडव, माजी सरपंच संजय पाटील आखाडे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे हे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. विदर्भ जनआंदोलन समितीचे अॅड. सुरेशराव वानखेडे हे “भ्रष्टाचारमुक्त जिल्हा परिषद” या घोषणेसह निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अंजनी बु जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण सुटल्याने येथेही चुरस वाढली आहे. शिंदे गटाकडून प्रा. विजय जागृत, श्याम इंगळे व सुमीत वानखेडे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रशांत पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, तर कॉंग्रेसकडून डॉ. भरत आल्हाट, सुधाकरराव धाबे आणि दत्ता इंगळे (पिंप्री माळी) हे संभाव्य उमेदवार आहेत.
दिवाळीत शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने सर्व उमेदवार जनतेशी संपर्क साधताना दिसत असले तरी, ‘आधी जिल्हा परिषद की नगर परिषद?’ या संभ्रमामुळे अनेक इच्छुकांची झोप उडाल्याचे दिसून येत आहे.

