Question Mark Over Census : देशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी भारताची जनगणना 2027 प्रक्रिया सुरू असताना बाळापुर शहरातील तयारी मात्र अपुरी असल्याचे चित्र समोर येत आहे. नगर परिषद क्षेत्रात जनगणना कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कर्मचारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.

कडक उन्हात साधनांविना जनगणना काम; नगर परिषद प्रशासनाविरोधात नाराजी
जाकीर अहमद
बाळापुर : देशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी भारताची जनगणना 2027 प्रक्रिया सुरू असताना बाळापुर शहरातील तयारी मात्र अपुरी असल्याचे चित्र समोर येत आहे. नगर परिषद क्षेत्रात जनगणना कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कर्मचारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळापुर शहरात जनगणना कामासाठी एकूण 73 प्रगणक आणि 12 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमानुसार सर्व कर्मचाऱ्यांना जनगणना किट वेळेत उपलब्ध होणे अपेक्षित होते, जेणेकरून काम सुरळीतपणे पार पाडता येईल. मात्र, 16 मे 2026 पर्यंत सर्व 73 किट नगर परिषद कार्यालयात पोहोचणे अपेक्षित असताना 20 मेपर्यंत केवळ 16 किटच उपलब्ध झाल्याची माहिती पुढे आली आहे.
यामुळे तब्बल 57 प्रगणक आजही आवश्यक साहित्यापासून वंचित असल्याचे सांगितले जात आहे. “किटशिवाय जनगणना काम प्रभावीपणे सुरू करणे कठीण आहे,” अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परिणामी, तळागाळात जनगणना कार्याच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, शहरात प्रचंड उष्णतेची लाट असून तापमान सुमारे 46 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. अशा कडक उन्हात आवश्यक साधने, साहित्य आणि पुरेशा सुविधा नसताना काम करावे लागत असल्याने प्रगणक व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. कर्मचारी आणि नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने आवश्यक व्यवस्था कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.
स्थानिक पातळीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशाच्या महत्त्वाच्या जनगणना प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य पुरवठ्यात एवढा विलंब का झाला? उर्वरित 57 किट तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. विलंबामुळे जनगणना प्रक्रियेच्या गतीवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवरही टीका होत असून, जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवून प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी ठोस नियोजन आणि वेळेवर साहित्य वितरण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

