Dispute over Farm :खल्याळगव्हाण शिवारात शेतातील सामाईक धुऱ्यावरून दोन शेतकऱ्यामध्ये वाद झाला. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकी दिल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देऊळगाव राजा : खल्याळगव्हाण शिवारात शेतातील सामाईक धुऱ्यावरून दोन शेतकऱ्यामध्ये वाद झाला. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकी दिल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल गणेश दंदाले (वय ३१, व्यवसाय शेती, रा. खल्याळगव्हाण, ता. देऊळगाव राजा) यांच्या तक्रारीवरून विष्णु नंदुजी डोईफोडे, रामकिसन नंदुजी डोईफोडे आणि बंडु कायंदे (सर्व रा. खल्याळगव्हाण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची शेती शेजारी शेजारी असून, १८ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी शेतातील सामाईक धुऱ्यावर मातीचे वळण टाकत होते. त्यावेळी फिर्यादीच्या आईने वळण स्वतःच्या हद्दीत घालण्याबाबत सांगितल्याने वाद सुरू झाला. यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी अमोल दंदाले यांनी शिवीगाळ का करता, असा जाब विचारल्यानंतर संबंधितांनी फिर्यादी तसेच त्यांच्या आई-वडिलांशी धक्काबुक्की करून पुन्हा शिवीगाळ केली. तसेच “आमची मुले पोलीसमध्ये आहेत, तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू,” अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९६, ११५(२), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा क्रमांक २२५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत. दरम्यान, याच शेतविवादातून यापूर्वीही दुसऱ्या पक्षाकडून मारहाणीची तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर येत असून, परस्परविरोधी तक्रारींमुळे या प्रकरणाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

