Sand Mafias Audacity : एकलारा शिवारात अवैध गौणखनिज (रेती) वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाच्या शासकीय कामात रेतीमाफीयाने अडथळा निर्माण करून सुरक्षा रक्षकाची रायफल हिसकावून ट्रॅक्टर पळवून नेला. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी एका नामनिर्देशित आरोपीसह आणखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एकलारा शिवारात अवैध रेती उत्खननावर छापा; सुरक्षा रक्षकाची रायफल फेकून ट्रॅक्टर पळविला
बोरगाव मंजू : एकलारा शिवारात अवैध गौणखनिज (रेती) वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाच्या शासकीय कामात रेतीमाफीयाने अडथळा निर्माण करून सुरक्षा रक्षकाची रायफल हिसकावून ट्रॅक्टर पळवून नेला. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी एका नामनिर्देशित आरोपीसह आणखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी नितील लक्ष्मण शिंदे अकोला यांनी तहसीलदारांच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गणेश श्रीराम भांडे याच्यासह अन्य दोन अज्ञात इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
महसूल विभागाच्या माहितीनुसार, १७ मेच्या मध्यरात्रीनंतर दहीहांडा मंडळ अधिकारी दत्तात्रय काळे, कापशी मंडळ अधिकारी मधुकर काळे, आगर मंडळ अधिकारी गणेश कचरे आणि सुरक्षा रक्षक प्रशांत सरदार यांच्यासह एकलारा शिवारात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रणासाठी गस्त घालण्यात येत होती. दरम्यान, पहाटे सुमारे १ वाजताच्या सुमारास एक नंबर प्लेट नसलेला ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आला.
पथकाने ट्रॅक्टर चालकाला थांबवून विचारपूस केली असता त्याने नाव, पत्ता व रॉयल्टीसंदर्भातील माहिती देण्यास टाळाटाळ केली व घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्याचा चेसिस क्रमांक JZCSK135659653 असल्याचे आढळून आले.
काही वेळाने घटनास्थळी आलेल्या एका व्यक्तीने स्वतःची ओळख गणेश श्रीराम भांडे अशी करून दिली व ट्रॅक्टर आपला असल्याचे सांगितले. महसूल पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तो तहसील कार्यालयात आणण्यासाठी कारवाई सुरू केली. मात्र, ग्राम कासली बुजवळ पोहोचल्यानंतर आरोपीने फोनवरून आणखी एका व्यक्तीस बोलावून घेतल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, दोघांनी मिळून सुरक्षा रक्षकाच्या जवळील रायफल हिसकावून फेकून दिली तसेच शासकीय कारवाईत अडथळा निर्माण करत ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. ट्रॅक्टरमधून अंदाजे एक ब्रास रेती (किंमत सुमारे ३ हजार रुपये) अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र गौणखनिज कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे व पोलीस कर्मचारी सुदीप राऊत करीत आहेत.

