Assault at Malkapur Pangra : येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी लावलेल्या रांगेत वाहन घुसविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीस कथितरीत्या बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पेट्रोल-डिझेल वितरणातील कथित अनियमिततेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कॅनमध्ये इंधन, रांगांमध्ये गोंधळ; मलकापूर पांगऱ्यात पेट्रोल पंपावर तणाव
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी लावलेल्या रांगेत वाहन घुसविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीस कथितरीत्या बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पेट्रोल-डिझेल वितरणातील कथित अनियमिततेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. शेती मशागतीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर, पंप व इतर शेती यंत्रांसाठी इंधनाची मोठी मागणी असल्याने अनेक वाहनधारक तासन्तास रांगेत उभे होते.
याचदरम्यान जागदरी येथील एका व्यक्तीने आपली कार कथितरित्या रांगेच्या मधोमध आणून उभी केल्याने उपस्थित वाहनधारकांनी आक्षेप घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून वाद निर्माण झाला आणि काही उपस्थितांनी संबंधित व्यक्तीस मारहाण केल्याची चर्चा आहे. दरम्यान, पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली व पुढील अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
इंधन वितरणावर प्रश्न
घटनेनंतर पेट्रोल पंपावरील इंधन वितरणाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, काही व्यक्तींना कॅनमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दिले जात असल्याने सर्वसामान्य शेतकरी व वाहनधारकांना इंधनासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच काही ठिकाणी अवैधरित्या जादा दराने इंधन विक्री होत असल्याचाही आरोप केला जात आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
स्थानिक ग्रामपंचायत सदस्य नामदेवराव उगले यांनी इंधन वितरणात पारदर्शकता आणि नियंत्रण आवश्यक असल्याचे सांगत नियमबाह्यरीत्या कॅनमध्ये इंधन दिले जात असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांचे स्पष्टीकरण
या घटनेबाबत साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे पीएसआय गणेश डोईफोडे यांनी सांगितले की, पेट्रोलिंगदरम्यान गर्दी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक माहितीनुसार संबंधित तक्रारकर्त्याने रांगेत वाहन घुसवल्याने वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून संबंधित व्यक्तीची तक्रार प्राप्त झाली आहे. मारहाण करणाऱ्यांची नावे तपासून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नागरिकांनी इंधन वितरण नियंत्रित व पारदर्शक करण्याची तसेच पुरवठा विभागाने परिस्थितीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

