Sanjay Gopanarayan : पातूर तालुक्यातील जय बजरंग विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयाचे कलाशिक्षक संजय गोपनारायण यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचा राज्यस्तरीय “आदर्श कलाशिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. मुंबई येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

वाडेगाव : पातूर तालुक्यातील जय बजरंग विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयाचे कलाशिक्षक संजय गोपनारायण यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचा राज्यस्तरीय “आदर्श कलाशिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. मुंबई येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी टिळक भवन, दादर (मुंबई) येथे पार पडला. या वेळी संजय गोपनारायण यांचा पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यात शिक्षक आमदार जयंत आसगावकर, साजिद खान पठाण, प्रा. प्रकाश सोनवणे, कार्याध्यक्ष प्रकाश तायडे, सचिन दुर्गाडे, प्रदेश सरचिटणीस यशराज पारखी आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय गोपनारायण हे केवळ एक कुशल कलाशिक्षक नसून समाजहितासाठी कार्यरत असलेले जागरूक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. शालेय स्तरावर त्यांनी माजी विद्यार्थी संघ, विद्यार्थिनी सुरक्षा समिती तसेच महिला व मुलींसाठी विविध सुरक्षाविषयक उपक्रम राबवून शाळेला सामाजिक बांधिलकीची दिशा दिली आहे.
यापूर्वी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार (दलित तरुण संघटना, नागपूर) आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

