Cutting a Birthday Cake with a Sword :वाढदिवसाच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करणे दोन युवकांना चांगलेच महागात पडले आहे. बोराखेडी पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून ४ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोताळा : वाढदिवसाच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करणे दोन युवकांना चांगलेच महागात पडले आहे. बोराखेडी पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून ४ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीतील वाघजाळ फाटा येथे राहुल गजानन वाघ (रा. वाघजाळ) हा आपला वाढदिवस सार्वजनिक ठिकाणी साजरा करीत होता. यावेळी त्याचा मित्र डमरू ऊर्फ करण धोंडू चव्हाण (रा. नेहरू नगर) याच्यासह हातात टोकदार व धारदार तलवार घेऊन तलवारीने केक कापण्यात आला.
या प्रकाराचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी शस्त्राचे प्रदर्शन करून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशन येथे अप. क्र. 239/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4/25, 7/25 तसेच कलम 135 मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी राहुल गजानन वाघ आणि डमरू ऊर्फ करण धोंडू चव्हाण यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सियाज चारचाकी वाहन (क्र. MH12NU1303), ओपो कंपनीचे दोन मोबाईल फोन आणि एक टोकदार धारदार तलवार असा एकूण ४ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू, पोउपनि राजेंद्र कपले, पोहेकॉ प्रविण पडोळ, बळीराम खंडागळे, रमेश नरोटे, सुनिल वाघ, पोका श्रीकांत चिंचोले आणि शेख ईसाक यांनी केली.

