Viral fever : सध्या डोणगाव परिसरात सोयाबीनच्या सुगीचा हंगाम सुरू असून प्रत्येक शेतकरी पावसापूर्वी आपला शेतीमाल सुरक्षितपणे घरात आणण्यासाठी जीवाचे रान करत आहे. अनेक शेतकरी आणि शेतमजूर तब्येत बरी नसतानाही शेतात काम करत असल्याने आजारपण वाढले आहे.त्यामुळे सकाळपासूनच डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. सध्या परिसरात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले असून दररोज सरासरी ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत.

सुगीच्या हंगामामुळे दिवसभर बाह्यरुग्ण तपासणी सुरू ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी
डोणगाव : सध्या डोणगाव परिसरात सोयाबीनच्या सुगीचा हंगाम सुरू असून प्रत्येक शेतकरी पावसापूर्वी आपला शेतीमाल सुरक्षितपणे घरात आणण्यासाठी जीवाचे रान करत आहे. अनेक शेतकरी आणि शेतमजूर तब्येत बरी नसतानाही शेतात काम करत असल्याने आजारपण वाढले आहे.त्यामुळे सकाळपासूनच डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. सध्या परिसरात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले असून दररोज सरासरी ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
गोरगरीब आणि सामान्य जनतेसाठी शासकीय आरोग्य यंत्रणाच मोठा आधार आहे. आर्थिक अडचण असली तरी सरकारी दवाखान्यात मोफत व शाश्वत उपचार मिळतात, या विश्वासाने लोक येथे उपचारासाठी येतात. विशेषतः सोयाबीन, गहू आणि हरभरा सुगीच्या दिवसात ग्रामीण जनतेकडे रोख रक्कम कमी असल्याने बहुतांश नागरिक खाजगी दवाखान्यांऐवजी सरकारी आरोग्य केंद्राचा आधार घेतात.
ग्रामीण भागातील लोकांना सरकारी दवाखाना लवकर उघडतो, याची चांगली माहिती असते. त्यामुळे अनेक शेतकरी शेतात जाण्यापूर्वीच सकाळी उपचारासाठी आरोग्य केंद्रात येतात. तथापि, बाह्यरुग्ण तपासणी (ओपीडी) सकाळी आठ वाजता सुरू होऊन दुपारी बारा वाजता बंद केली जाते.
यामुळे अनेक रुग्णांना उपचार न मिळता परत जावे लागते किंवा तातडीच्या शेतीकामामुळे अर्धवट उपचार घेऊनच शेतात जावे लागते. १३ ऑक्टोबर रोजी सकाळीही अनेक शेतकरी व शेतमजूर उपचारासाठी आले असताना ओपीडी वेळ संपल्याने काहींना परत जावे लागले. परिसरातील वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता, डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण तपासणी दिवसभर सुरू ठेवावी, अशी मागणी स्थानिक रुग्ण व नागरिकांनी केली आहे.

