Sharad Pawar Junior College : शरद पवार कनिष्ठ महाविद्यालय, वरूडने यंदाही बारावी (१२ वी) परीक्षेत विज्ञान व कला या दोन्ही शाखांमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत सलग २० वर्षांचा मानाचा टप्पा गाठला आहे. महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विज्ञान-कला दोन्ही शाखांत १०० टक्के यश; १३४ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन
मासरुळ : शरद पवार कनिष्ठ महाविद्यालय, वरूडने यंदाही बारावी (१२ वी) परीक्षेत विज्ञान व कला या दोन्ही शाखांमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत सलग २० वर्षांचा मानाचा टप्पा गाठला आहे. महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विज्ञान शाखेचा निकाल विशेष उल्लेखनीय ठरला आहे. या शाखेत एकूण १४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी तब्बल १३४ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन मिळवले, तर उर्वरित १३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत यश संपादन केले. त्यामुळे विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला शाखेतही उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. या शाखेत ४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परिणामी, कला शाखेचाही निकाल १०० टक्के लागला आहे. महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, प्राध्यापकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा हे प्रमुख घटक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तबद्ध अभ्यासपद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले असल्याचेही सांगितले जाते. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र गोडे, प्राचार्य किरण तायडे, प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

