A staggering 729 villages : जिल्ह्यातील तब्बल 729 गावांना पाणीटंचाई ग्रस्त जाहीर झाले आहे. 18 गावांसाठी टँकर मंजूर करण्यात आले आहेत तर 59 गावांमध्ये विहीरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत.

पाणीटंचाईवर सरकारचा फोकस; जलसंधारणाला गती देण्याचे आदेश – पालकमंत्री मकरंद पाटील
बुलढाणा : जिल्ह्यातील तब्बल 729 गावांना पाणीटंचाई ग्रस्त जाहीर झाले आहे. 18 गावांसाठी टँकर मंजूर करण्यात आले आहेत तर 59 गावांमध्ये विहीरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. ‘अल नीनो’च्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेत राज्य सरकारने पाणीटंचाई व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत केले असून जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले.
नियोजन भवन येथे झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विविध लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आगामी काळात कमी पावसाची शक्यता लक्षात घेता सरकारने जिल्हास्तरावर पूर्वतयारी सुरू केली असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.
पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, टंचाईग्रस्त भागांमध्ये नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देताना निधीअभावी रखडलेली जलसंधारणाची कामेही प्राधान्याने मार्गी लावण्यावर त्यांनी भर दिला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
राजकीय पातळीवर पाहता, आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन सत्ताधारी यंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र असून, ग्रामीण भागातील पाणीप्रश्नावर सरकारची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. जलसंधारण, पाणी साठवण आणि जलस्रोत पुनर्भरणाच्या उपाययोजनांवर भर देत प्रशासनाला ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नळगंगा, खडकपूर्णा व पेनटाकळी या तीन मोठ्या प्रकल्पांसह 7 मध्यम व 41 लघु प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 30.64 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जून 2026 पर्यंतचा कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील 729 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून सध्या 18 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच 59 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, विरोधकांकडून पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त होत असून, येत्या काळात पाणीप्रश्नावर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

