Inflow of customers slows down: अलीकडच्या काही दिवसांपासून सोन्या–चांदीच्या दरात होत असलेली सातत्यपूर्ण वाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. एकेकाळी सणासुदीच्या काळात दागिने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करणारा सामान्य ग्राहक आज बाजारपेठेतून जवळजवळ गायब झाला आहे.

लोणार : अलीकडच्या काही दिवसांपासून सोन्या–चांदीच्या दरात होत असलेली सातत्यपूर्ण वाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. एकेकाळी सणासुदीच्या काळात दागिने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करणारा सामान्य ग्राहक आज बाजारपेठेतून जवळजवळ गायब झाला आहे.
सध्याच्या घडीला फक्त गुंतवणूकदार वर्गच या मौल्यवान धातूंच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव प्रति तोळा १ लाख २७ हजारांच्या घरात तर चांदीचा भाव किलोमागे १ लाख ७५ हजारांवर पोहोचल्याने बाजारपेठेतील चैतन्य ओसरले आहे.
सोनार व ज्वेलर्स संघटनेच्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याच्या विक्रीत जवळपास ६० टक्क्यांनी घट झाली आहे. अनेक ज्वेलर्सनी स्पष्ट केले की, सध्या केवळ लग्नसमारंभासाठी किंवा गुंतवणुकीच्या हेतूनेच खरेदी केली जात आहे. आगामी काळात सोन्याचे दर १ लाख ३५ हजारांपर्यंत, तर चांदीचे दर २ लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांसाठी पुढील काळ हा चिंतेचा ठरणार आहे.
दरवाढीमागे अनेक आंतरराष्ट्रीय घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अमेरिका–चीनमधील सुरू असलेला ट्रेड वॉर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची टॅरिफ नीती, चायनाने चांदीच्या आयातीवर लादलेले निर्बंध तसेच इस्त्रायल–हमास आणि युक्रेन–रशिया युद्धस्थिती यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली आहे.
डॉलरच्या वाढत्या मूल्यासह गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोने–चांदीकडे वळल्याने दरवाढ आणखी गतीमान झाली आहे. सामान्य ग्राहकांच्या दृष्टीने ही वाढ चिंताजनक ठरत असून ग्रामीण भागात शेतकरी आणि मजूर वर्गाकडे दागिन्यांची खरेदी करण्याची क्षमता जवळजवळ संपली आहे.
पारंपरिक पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करण्याची मानसिकता कमी होत असून अनेक जण आता बँक ठेवी किंवा म्युच्युअल फंडच्या ऐवजी सोन्या–चांदीसारख्या पर्यायांकडे वळत आहेत.
आगामी दिवाळी आणि लग्नसराईच्या हंगामात या दरवाढीचा परिणाम बाजारपेठेवर स्पष्टपणे जाणवेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सोन्या–चांदीच्या वाढत्या किंमतींमुळे या हंगामात दागिन्यांची विक्री अत्यल्प राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जागतिक राजकीय परिस्थिती स्थिर न झाल्यास दरवाढीचा हा कल पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

