Wife Murdered : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ही घटना २७ एप्रिल रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास मालेगाव शहरातील अकोला फाटा परिसरात घडली. पुष्पा विठ्ठल वाघ (वय ३४) असे मृतक महिलेचे नाव आहे. तसेच विठ्ठल परसराम वाघ असे आरोपी पतीचे नाव असून मालेगाव पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपी पतीस पोलिसांनी केली अटक : पती,पत्नीमध्ये नेहमीच होत होते वाद
मालेगाव : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ही घटना २७ एप्रिल रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास मालेगाव शहरातील अकोला फाटा परिसरात घडली. पुष्पा विठ्ठल वाघ (वय ३४) असे मृतक महिलेचे नाव आहे. तसेच विठ्ठल परसराम वाघ असे आरोपी पतीचे नाव असून मालेगाव पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल वाघ हा मूळचा मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील रहिवासी असून, गेल्या काही वर्षांपासून तो कुटुंबासह मालेगाव शहरातील पोस्ट ऑफिससमोरील वसाहतीत राहत होता. पत्नी पुष्पाच्या चारित्र्यावरून तो वारंवार संशय घेत असल्याने पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. सोमवारी सकाळीही याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला.वादानंतर पुष्पा घराबाहेर पडताच विठ्ठलने तिचा पाठलाग केला. मालेगाव-अकोला महामार्गावरील एका कार्यालयासमोर गाठून त्याने धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या पुष्पाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेश खेरडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलिस अधीक्षक नयनदीप अग्रवाल यांनीही भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. मृत महिलेचा भाऊ ओम नारायण राऊत यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपी विठ्ठल वाघ स्वतः मालेगाव पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश खेरडे करीत आहेत. या घटनेने मालेगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

