Eid-e-Miladunnabi: इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव मलकापूर पांग्रा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण जगाला शांती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रेषितांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मलकापूर पांग्रा : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव मलकापूर पांग्रा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण जगाला शांती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रेषितांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी दहा वाजता कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर रक्तदान शिबिर व हिजामा कॅम्प थेरपीद्वारे अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड व बीट जमादार निवृत्ती पोफळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष महमुदयार खान, साबीर मौलाना, गुलशेर खासाब, रफिक मास्टर, हनीफ बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

५१ जणांनी केले रक्तदान
या रक्तदान शिबिरामध्ये हिंदू-मुस्लिम मिळून एकूण ५१ जणांनी रक्तदान केले. शिबिराला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, नूर हॉस्पिटल बदनापूर यांनी सहकार्य केले. दुपारी गावातील साबीर महाराज यांच्या टीमतर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच दुपारी तीन वाजता गावातील जामा मस्जिद येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक मुख्य रस्त्याने बसस्थानक मार्गे हुसेनिया मस्जिदपर्यंत काढण्यात आली. कुराण पठण करून फातेहाखाणी करण्यात आली. मार्गात विविध ठिकाणी शरबत, गोड भात, फळे, लाडू आदींचे वाटप करण्यात आले. हजरत मोहम्मद पैगंबरांच्या जयघोषात व उत्साहात ईद-ए-मिलादुन्नबी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांसह विविध समाजातील नागरिकांनी सहभाग नोंदविला. साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, बीट जमादार निवृत्ती पोफळे तसेच पाेलिस कर्मचाऱ्यांनी यावेळी चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता.