Stop Child Marriage : पातुर पोलिसांसह अकोला बाल कल्याण समितीने बाभुळगाव येथे होणारा बालविवाह थांबविला. समितीने बालिका तसेच तिच्या पालकांशी संवाद साधून त्यांना बालविवाह अधिनियमाविषयी माहिती दिली.

बालिका आणि पालकांशी संवाद साधून केले मार्गदर्शन
पातूर: पातुर पोलिसांसह अकोला बाल कल्याण समितीने बाभुळगाव येथे होणारा बालविवाह थांबविला. समितीने बालिका तसेच तिच्या पालकांशी संवाद साधून त्यांना बालविवाह अधिनियमाविषयी माहिती दिली.
पातूर तालुक्यातील बाभुळगाव येथे 16 एप्रिल रोजी बालविवाह होणार असल्याची गुप्त माहिती पातूर पोलीस आणि बाल कल्याण समितीला मिळाली. या माहितीच्या आधारे पातुर पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच जिल्हा बाल संस्थाण कक्ष, बाल कल्याण समिती, अकोला यांच्या संयुक्त पथकाने वेळेचे गांभिर्य ओळखुन नमुद बालविवाह पार पडत असलेल्या बाभुळगाव या गावी धाव घेतली. तेथे जाउन पथकाने प्रथम मुलीच्या जन्म तारखेबाबत खात्री केली. व सदरची मुलगी ही अल्पवयीन असल्याची शहानिशा केल्यानंतर ज्या ठिकाणी तो विवाह पार पडत आहे तेथे जाउन सदरचा विवाह थांबविण्यात आला. तद्नंतर बालिका आणि पालक यांच्याशी संवाद साधुन त्यांना बालविवाह अधिनियम, २००६ बाबत कायदेशिर मार्गदर्शन करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी , उप विभागिय पोलीस अधिकारी गजानन पडघण यांचे मार्गदर्शनाखाली पो. स्टे पातुर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड, पो.शि शंकर बोरकर, पो.शि. साई नवले तसेच बाल कल्याण समिती, अकोला येथील सदस्य प्रांजली जयस्वाल तसेच बाल कल्याण समितीचे सुनील लाडुरकर, सुनील सरकटे यांनी संयुक्तपणे पार पाडली.

