One-Day National Conference : येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात १७ एप्रिल २०२६ रोजी ‘भारतीय ज्ञानप्रणाली: वाणिज्य, व्यवस्थापन, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि तात्विक पैलू’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली.

पातूर: येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात १७ एप्रिल २०२६ रोजी ‘भारतीय ज्ञानप्रणाली: वाणिज्य, व्यवस्थापन, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि तात्विक पैलू’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली.
उद्घाटकीय सत्राच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथील प्रा.डॉ.रोहिदास नितोंडे, उद्घाटक म्हणून अकोलाचे विलासराव हरणे तर बीजभाषक म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर लाभले होते. परिषदेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांनी केले. त्यांनी परिषदेचा उद्देश कथन केला. उद्घाटक विलासराव हरणे यांनी प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेतील कुटुंब परंपरेवर भाष्य केले. बीजभाषक डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी भारतीय ज्ञान परंपरा ही आधुनिक भारताच्या जडणघडणीकरिता दीपस्तंभ आहे असे प्रतिपादन केले. उद्घाटकीय सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ.रोहिदास नितोंडे यांनी भारतीय ज्ञानपरंपरा हा विषय विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कृती, नैतिकता या मानवी जीवनातील संस्कारक्षम पैलूवर प्रकाश टाकते असे भाष्य केले.
परिषदेत दोन तांत्रिक सत्र संपन्न झाले .पहिल्या सत्रात ‘वाणिज्य, व्यवस्थापन आणि वैज्ञानिक परिमाणे’ या विषयावर नागपूरच्या महाविद्यालयाचे प्रा. डॉ.श्रेयश कुऱ्हेकर यांनी मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.रावसाहेब काळे हे होते.
दुसऱ्या सत्रात ‘सांस्कृतिक आणि तात्विक पैलू’ यावर पुणे येथील प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील यांनी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. राजेश श्रीखंडे यांनी मार्गदर्शन केले.परिषदेमध्ये विविध विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांचे १५० शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले असून जवळपास १७५ संशोधकांनी परिषदेमध्ये नोंदणी करून सहभाग घेतला.
समारोपीय सत्राचे अध्यक्ष प्राचार्य किरण एस खंडारे तर प्रा.डॉ.राजेश श्रीखंडे यांची उपस्थिती होती.या सत्रात शोधनिबंध व भित्तिपत्रक सादरीकरण करण्यात येऊन मानचिन्ह देण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रीय परिषदेचे सचिव डॉ. खांदेल,डॉ. धुमाळे,डॉ. दिपाली घोगरे व डॉ. वसु, प्रा.विखे, उपस्थित होते. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रा. भोंगळे,डॉ.ढोरे,श्री. इंगळे,श्री. चव्हाण, अमानकर यांचे विशेष सहकार्य मिळाले.

