all crops are plagued by disease : गेल्या 370 वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळच्या मांडणीचा अंदाज 20 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये यंदा सर्वच पिकांवर रोगराई येणार असून पावसाचे प्रमाण असमान राहणार आहे. जूनमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसाचे प्रमाण असमान राहणार आहे. देशाचा राजा कायम राहणार असला तरी ताणावात राहण्याचा अंदाज घडमांडणीत व्यक्त करण्यात आला आहे.

भेंडवळच्या मांडणीचा निष्कर्ष जाहीर : जूनमध्ये मुसळधार पाऊस, काही भागात महापुर
जळगाव जामोद : गेल्या 370 वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळच्या मांडणीचा अंदाज 20 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये यंदा सर्वच पिकांवर रोगराई येणार असून पावसाचे प्रमाण असमान राहणार आहे. जूनमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसाचे प्रमाण असमान राहणार आहे. देशाचा राजा कायम राहणार असला तरी ताणावात राहण्याचा अंदाज घडमांडणीत व्यक्त करण्यात आला आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करण्यात येते. यावर्षी 19 एप्रिल रोजीही मांडणी करण्यात आली. तसेच सोमवारी सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी पाऊस राजकीय व देशाच्या संरक्षण स्थिती याविषयी अंदाज व्यक्त करण्यात आला.
भेंडवळ येथील घटमांडणीवर बुलढाणा जिल्हाच नव्हे तर मराठवाडा आणि खांदेशातील शेतकर्यांचा विश्वास आहे. घटमांडणीचा अंदाज एकण्यासाठी शेतकरी रात्री मुक्कामी येतात. घटमांडणीच्या निष्कर्षानुसार यंदाचे वर्ष शेतकर्यांसाठी अडचणीचेच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. खरीप हंगामात पावसाचे प्रमाण असमान राहणार आहे. जूनमध्ये अति पाऊस होणार असून काही भागात पूरस्थिती राहणार आहे. तसेच देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान त्यांच्या खुर्चीवर कायम राहणार असले तरी ते तणावात राहणार आहेत. देशाची संरक्षण स्थिती ही कमकुवत राहील संरक्षण खात्यावर मोठा ताण असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
असे ठरते भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत
घटमांडणीमध्ये मातीचे ढेकळ ठेवण्यात येतात. त्यावरून चार महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. तसेच विविध धान्यावरून आगामी हंगामात पिके कसे राहतील याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. चारा-पाणीसाठी सांडाई, कुरडई, तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते. करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. भादलीरोगराईचे, तर पान-विडा राजाच्या गादीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. राजा म्हणजे पंतप्रधान. पान, विड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक आहे.या प्रतिकांच्या हालचालीवरून त्यांच्याविषयी भाकित केले जाते.
असे आहे भाकित
भेंडवळच्या घटमांडणीनुसार यंदा सर्वच पिकांवर रोगराईचे प्रमाण राहणार आहे. तसेच कापूस, तांदूळ पिकाचे उत्पन्न भरपूर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्वारी , तूर, मुंग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण तर तीळ, बाजरी या पिकांचे उत्पादन भरघोस येणार आहे. पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलै सर्वसाधारण, ऑगस्ट, सप्टेंबर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. तरीही राज्यभरातील शेतकरी या घटमांडणीवर विश्वास ठेवतात.

