“Pradhan Mantri Awas Yojan: नगर परिषद, देऊळगाव राजा अंतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 – सर्वांसाठी घरे” या योजनेचा शुभारंभ आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते संजय नगर भागात करण्यात आला.

३५ वर्षांपासून घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटले समाधानाचे हास्य
देऊळगाव राजा : नगर परिषद, देऊळगाव राजा अंतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 – सर्वांसाठी घरे” या योजनेचा शुभारंभ आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते संजय नगर भागात करण्यात आला.
गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून नगरपरिषदेच्या हद्दीतील शासकीय जागांवर दुर्बल घटकातील नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांना नियमित घरकुल मिळावे, या हेतूने शासनाच्या सर्वांसाठी घरे या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाचे नियमन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उद्घाटन प्रसंगी आमदार मनोज कायंदे म्हणाले की, “प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर मिळावे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. नगरपरिषद आणि नागरिकांच्या सहकार्याने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल.”
यावेळी नगरपरिषद देऊळगाव राजाचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आणि नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
गेल्या तीन दशके स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे समाधानाचे हास्य झळकले. जय शिवसंग्राम संघटनेनेही नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून वारंवार निवेदन देत पाठपुरावा केला होता.
या कार्यक्रमाला अंबर मसाल्याचे संचालक हाजी सिद्दीक सेठ, रफिक मेंबर, हाजी करीमभाई, हनीफ शहा, प्रदीप वाघ, सदाशिव मुंडे, शुभम पाटील, हाजी अमजद खान, अन्वर खान पठाण, जमील सर, आरिफ पठाण, सय्यद नईम, शेख आतिक, नगरपरिषदेचे वानखेडे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन घरकुल एजन्सीचे शेख आवेस व आवेस पठाण यांनी मानले.

