Shri Balaji Maharaj : प्रतितिरूपती व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बालाजी महाराजांचा ३३३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला लळितोत्सव हजारो भाविकांच्या साक्षीने आश्विन कृ. ४, शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी सूर्योदयी ५.४५ वाजता संपन्न झाला.

३३३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा ;डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुपम सोहळा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : प्रतितिरूपती व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बालाजी महाराजांचा ३३३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला लळितोत्सव हजारो भाविकांच्या साक्षीने आश्विन कृ. ४, शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी सूर्योदयी ५.४५ वाजता संपन्न झाला.
श्री बालाजी महाराजांच्या मंदिरासमोर विजयादशमीच्या पूर्वसंध्येला २१ महाकाय लाकडी लाटा आणि ४२ मंडप दोऱ्यांच्या सहाय्याने उभारून मंडपोत्सव साजरा करण्यात आला होता. हा मंडपोत्सव अखंड दहा दिवस चालला. राज्यभरातून भाविकांनी लाटा आणि मंडपाखालून जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. भारतात इतरत्र कुठेही नसलेला असा लळितोत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक पूर्वसंध्येलाच देऊळगाव राजा येथे दाखल झाले होते.
सकाळी काकड आरतीनंतर मंदिरावर दहीहंडी बांधण्यात आली. यावेळी ब्रह्मवृंदांच्या वतीने शांतीपाठ करण्यात आला आणि काल्याचे कीर्तन पार पडले. श्रींची आरती सुरू झाल्यानंतर तसेच दहीहंडी फुटल्यानंतर सर्व २१ लाटा एकाच वेळी मंदिराच्या दिशेने कलंडल्या. भक्तांनी टाळ्यांच्या गजरात आणि श्रींच्या जयघोषात या अद्वितीय सोहळ्याचा आनंद लुटला. त्यानंतर श्रींच्या मूर्तीला विधीवत गाभाऱ्यात स्थापित करण्यात आले.
उत्सवानंतर श्री बालाजी संस्थानतर्फे सर्व भाविकांना लाडू प्रसाद वाटप करण्यात आला. लाडू प्रसादाची तयारी व वितरण कार्य मारवाडी समाजाने सांभाळले. अधिक प्रसाद हवा असलेल्या भाविकांसाठी प्रत्येकी १० रुपयांत लाडू उपलब्ध करून देण्यात आले, ज्याला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहरात पूर्वसंध्येलाच दाखल झालेल्या भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना व मित्रमंडळांकडून चहा, नाश्ता व इतर सेवांची व्यवस्था करण्यात आली होती. श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी सर्व स्टॉलना भेट देऊन सेवाभावी मंडळांचा श्री बालाजी संस्थानतर्फे सत्कार केला.
उत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाचे प्रयत्न
लळितोत्सव शांततामय व सुरळीत पार पडावा यासाठी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, आमदार मनोज कायंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट समन्वय साधला. यात्रा-उत्सवाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेची काटेकोर तयारी केली होती.
पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे आणि कांचन जारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा व बुलढाणा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. व्यवस्थापक किशोर बीडकर, संस्थानचे कर्मचारी, सेवेकरी आणि नागरिकांनी या सोहळ्याच्या यशासाठी अथक परिश्रम घेतले.
स्वयंसेवी संघटनांची निःस्वार्थ सेवा
या उत्सवासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने आले होते. परिवहन महामंडळाने अतिरिक्त बससेवेची व्यवस्था केली होती. शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विविध स्वयंसेवी संस्था आणि संघटनांनी चहा-फराळाचे स्टॉल उभारले होते.
विशेष म्हणजे, मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या उपक्रमानुसार परिसरातील स्वयंसेविका महिलांनी अन्नछत्र सेवा, मंदिर परिसराची स्वच्छता, भाविकांच्या दर्शन रांगा नियंत्रण, तसेच लाडू प्रसाद वितरण यांसारख्या सेवांमध्ये आठवडाभर स्वयंसेवा देत सेवाभावाचा सुंदर आदर्श निर्माण केला.

