Driver fainted : चालकाला झाेपेची डुलकी लागल्याने भरधाव मालवाहु वाहन समाेरुन येणाऱ्या अज्ञात वाहनावर धडकले. यामध्ये मालवाहु वाहनाचा चालक जागीच ठार झाला. हा अपघात समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २९६.९ वर ९ ऑक्टाेबर राेजी सकाळी घडला. दत्तात्रय सतीश आव्हारे (वय २४, रा. श्रीरामपूर) असे मृतक चालकाचे नाव आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : चालकाला झाेपेची डुलकी लागल्याने भरधाव मालवाहु वाहन समाेरुन येणाऱ्या अज्ञात वाहनावर धडकले. यामध्ये मालवाहु वाहनाचा चालक जागीच ठार झाला. हा अपघात समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २९६.९ वर ९ ऑक्टाेबर राेजी सकाळी घडला. दत्तात्रय सतीश आव्हारे (वय २४, रा. श्रीरामपूर) असे मृतक चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय सतीश आव्हारे हे आपल्या आयशर वाहनासह चंद्रपूरहून संगमनेरच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान त्यांना झोपेची डुलकी लागल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनास जोरदार धडक बसली. त्यानंतर आयशरला मागूनही दुसऱ्या वाहनाने धडक दिली. या दुहेरी धडकेत आयशरचा चक्काचूर झाला आणि चालक दत्तात्रय आव्हारे हे जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच ॲम्बुलन्स १०८ चे डॉ. वैभव बोराडे व चालक प्रदीप पडघान यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तसेच अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, मेहकर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत.
या अपघातामुळे महामार्गावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. झोपेच्या डुलकीमुळे झालेल्या या अपघाताने पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित केला आहे.

