Shahbabus sacred :अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात हजरत ख्वाजा सैय्यद अब्दुल अजीज उर्फ शाहबाबू रहमतुल्लाह अलैह यांच्या वार्षिक उर्स मुबारक निमित्त भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र उर्सद्वारे मुस्लिम-हिंदू ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जाणार आहे.

जाकीर अहमद
बाळापूर : अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात हजरत ख्वाजा सैय्यद अब्दुल अजीज उर्फ शाहबाबू रहमतुल्लाह अलैह यांच्या वार्षिक उर्स मुबारक निमित्त भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र उर्सद्वारे मुस्लिम-हिंदू ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जाणार आहे.
मजावरपुरा (पातूर) येथील शाहबाबू मैदानात होणाऱ्या या सोहळ्यात पारंपरिक धार्मिक विधींसह आकर्षक कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने भाविक व जियारती सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्स कार्यक्रमाची सुरुवात रविवार, २९ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता ‘रसम-ए-संदल शरीफ’ने होणार आहे. या निमित्ताने भव्य मिरवणूक शहरातून मार्गक्रमण करत दरगाह शरीफ येथे पोहोचेल. येथे भाविक हजेरी लावून विशेष दुआमध्ये सहभागी होतील. दरगाह परिसरात पारंपरिक धार्मिक विधी मोठ्या भक्तीभावाने पार पडतील.
सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी नमाज-ए-जुहरनंतर शाहबाबू मैदानात भव्य कव्वाली महफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राजस्थानचे सुप्रसिद्ध कव्वाल दिलशाद इरशाद साबरी हे आपल्या ‘साबरी ब्रदर्स’ टीमसह सूफीयाना कव्वाल्या सादर करणार आहेत. त्यांच्या सुरेल आवाजामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आध्यात्मिक रंगात रंगून जाणार आहे.
उर्स मुबारकची सांगता मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी नमाज-ए-जुहरनंतर फातेहा पठणाने होणार आहे. यावेळी दरगाह शरीफ येथे देशात शांतता, एकता आणि प्रगतीसाठी विशेष दुआ करण्यात येईल.
आयोजकांच्या मते, हा उर्स केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक ऐक्य आणि परस्पर सौहार्दाचे प्रतीक आहे. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उर्स समितीने सर्व भाविक, जियारती आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

