Akola Police Recruitment: अकोला पोलीस दलातर्फे सन २०२४-२५ या वर्षासाठी पोलीस शिपाई पदांच्या १६१ रिक्त जागांसाठी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या एकत्रित गुणांच्या आधारे तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) आणि प्रतीक्षा यादी (Provisional Waiting List) जाहीर करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई भरतीत पुढचा टप्पा; निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध
अकोला : अकोला पोलीस दलातर्फे सन २०२४-२५ या वर्षासाठी पोलीस शिपाई पदांच्या १६१ रिक्त जागांसाठी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या एकत्रित गुणांच्या आधारे तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) आणि प्रतीक्षा यादी (Provisional Waiting List) जाहीर करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. ११ ते २१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीतील गुणांच्या आधारे १:१० या प्रमाणात २३१४ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले.
रविवार, १५ मार्च २०२६ रोजी अकोला शहरातील चार परीक्षा केंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत लेखी परीक्षा पार पडली. पात्र ठरलेल्या २३१४ उमेदवारांपैकी २२८१ उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले. त्यापैकी १३९५ पुरुष व ४५० महिला असे एकूण १८४५ उमेदवार उत्तीर्ण झाले.
२५ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली ही तात्पुरती यादी कागदपत्र पडताळणीच्या अधीन असून शासनाच्या विविध परिपत्रक व निर्णयांनुसार तयार करण्यात आली आहे. यामध्ये अनाथ प्रवर्गातील उमेदवारांचाही संबंधित प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन समावेश करण्यात आला आहे.
ही तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना या यादीबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अधिकृत ई-मेलवर सविस्तर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ही यादी तात्पुरती असल्याने उमेदवारांनी अंतिम निवड झाल्याचे समजू नये. लवकरच कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना बोलावण्यात येणार असून, त्याबाबतच्या पुढील सूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

