₹34 Lakh Scam Exposed :लोहारा ग्रामपंचायतीतील तब्बल ३४ लाख ५९ हजार रुपयांच्या अपहाराचा मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कागदोपत्री विकासकामे दाखवून निधी लाटल्याच्या आरोपावरून सरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईची चाहूल लागताच दोघांनी गावातून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर उच्च न्यायालयाचा दणका; कागदोपत्री विकासकामांमधून निधी लाटल्याचा आरोप
जाकीर अहमद
बाळापूर : लोहारा ग्रामपंचायतीतील तब्बल ३४ लाख ५९ हजार रुपयांच्या अपहाराचा मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कागदोपत्री विकासकामे दाखवून निधी लाटल्याच्या आरोपावरून सरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईची चाहूल लागताच दोघांनी गावातून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पंचायत समिती बाळापूरचे विस्तार अधिकारी गंगाधर गुंडेकर यांच्या तक्रारीवरून १२ मार्चच्या रात्री उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४७/२६ अन्वये भादंवि कलम ४२० व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर १३ मार्च रोजी लोहारा ग्रामपंचायत कार्यालयाची झडती घेऊन कार्यालय सील करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच प्रवीण प्रल्हाद मोरे आणि सचिव गजेंद्र बाळापूरकर यांनी संगनमत करून ग्रामपंचायतीच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. गावातील विकासकामे प्रत्यक्षात न करता ती कागदोपत्री पूर्ण दाखवून लाखो रुपयांचा निधी हडप केल्याची तक्रार माजी उपसरपंच हिम्मतराव तायडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती.
तक्रारीनंतर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने तपास करताना ३४ लाख ५९ हजार रुपयांच्या अपहाराची स्पष्ट पुष्टी केली. मात्र दीर्घकाळ कारवाई न झाल्याने तायडे यांनी थेट नागपूर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली. न्यायालयाने सुनावणीनंतर सरपंच व सचिवांना जबाबदार धरत गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सरपंच प्रवीण मोरे आणि सचिव गजेंद्र बाळापूरकर दोघेही फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज कांबळे करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्येही धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले होते. या संदर्भात उपसरपंचासह नऊ सदस्यांनी अकोला येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर काही सदस्यांवरही कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे.
“नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३४ लाख ५९ हजार रुपयांच्या अपहार प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सरपंच आणि सचिवांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.”
— गंगाधर गुंडेकर, विस्तार अधिकारी, पंचायत समिती बाळापूर

