Sudden Sighting of a Leopard :मोहाडी येथील पाझर तलाव परिसरात शुक्रवारी (दि. १३) सकाळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुषांनी बिबट्या दिसताच घाबरून घराच्या दिशेने धाव घेतली.

दहा दिवसांत दुसरी घटना; बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी
साखरखेर्डा : मोहाडी येथील पाझर तलाव परिसरात शुक्रवारी (दि. १३) सकाळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुषांनी बिबट्या दिसताच घाबरून घराच्या दिशेने धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० ते ११ वाजताच्या दरम्यान मोहाडी येथील बबनराव रिंढे यांच्या शेताजवळील पाझर तलावात बिबट्या पाणी पिण्यासाठी आल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यावेळी परिसरात काम करणाऱ्या शेतमजुरांनी घाबरून आरडाओरड करत सुरक्षित स्थळी धाव घेतली.
दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपुरवठा विहिरीवरील जळालेला मोटारपंप बसविण्यासाठी तलाव परिसरात गेले असता त्यांनाही तलावाजवळ बिबट्या दिसून आला. कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने तेथून पळ काढत कोराडी नदीच्या दिशेने दत्ता पाटील सुरुशे यांच्या शेतातून जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याची माहिती मिळाली.
यानंतर विलास आबा रिंढे व बबनराव रिंढे यांच्यासह काही ग्रामस्थांनी हातात काठ्या घेऊन परिसरात शोध घेत बिबट्याला दूर हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरात गहू, हरभरा, मका व कांदा बियाण्याची लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने दाट पिकांमुळे बिबट्याचा नेमका मागोवा घेणे कठीण होत आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिंदी परिसरातील चंदनपूर पाझर तलावाजवळही बिबट्याचा वावर आढळून आला होता. त्यावेळी बिबट्याने दोन कुत्रे व एका माकडाची शिकार केल्याची घटना घडली होती. या घटनेची तक्रार देऊळगाव राजा वनविभागाकडे करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
परिसरात बिबट्याचा वावर वाढत असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने या घटनेची दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी मोहाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

